दूषित पाण्यात बसून ग्रामस्थांचे आंदोलन- चारी काढून देण्याची मागणी

संतोष आटोळे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पारवडी येथे खडकवासला कालव्यालगतच्या होले वस्ती येथील प्रकार

पाटबंधारे कर्मचारी व आंदोलकांमध्ये शाब्दिक वादावादी
याबाबत पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी संबंधित स्थळावर चारी काढण्याचे काम सुरु केले मात्र पाणी बाहेर काढण्याच्या मोरीपेक्षा साठलेल्या पाण्याची खोली अधिक असल्याने पाणी कमी होत नव्हते. यामुळे ते आंदोलकांना आम्ही पाणी काढू, तुम्ही बाहेर या असे सांगत होते. मात्र, आंदोलक ठाम राहिल्याने त्यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली.

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील पारवडी येथून जाणाऱ्या खडकवाला कालव्यातून पाझरणाऱ्या तसेच पावसाच्या पाण्याला पाटबंधारे विभागाकडून व्यवस्थित चारी काढून दिले नसल्याने संबंधित भागातील पिके पाण्यात गेली. तसेच येथे साठलेल्या पाण्याच्या जवळच पिण्याच्या पाण्यासाठीची खाजगी विहीर असल्याने साठलेले दूषित पाणी विहिरीत पाझरत असल्याने होले वस्ती येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ तेथील ग्रामस्थांनी रविवारी (ता. 17) रोजी सकाळपासुन दूषित पाण्यात बसूनच आंदोलन सुरू केले.

ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतल्यानंतर याची दखल घेत पाटबंधारे विभागाच्या वतीने चारी काढण्यासाठी मशीन उपलब्ध करून कामाला सुरवात करण्यात आली. मात्र, काम पूर्ण होईपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. यामुळे संध्याकाळपर्यत आंदोलन सुरूच होते. मात्र एकंदरीत या प्रकरणामुळे पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार समोर आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खडकवासला पाटबंधारे विभागाचा इंदापूरकडे जाणारा कालवा पारवडी (ता. बारामती) येथील होले वस्ती परिसरातून जातो. मध्यंतरी याभागात कालव्यावरील भराव्याची दुरुस्ती करून रस्ता तयार करण्यात आला. मात्र रस्ता तयार करत असताना कालव्याच्या कडेला पाझरणाऱ्या तसेच पावसाच्या साठणाऱ्या पाण्याला जाण्यासाठी योग्य चारी न काढण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठले. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ते पाणी साठून राहिल्याने दूषित बनले. याच परिसरात शेतकऱ्यांची विहीर असुन या विहीरीचे पाणी या भागातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने ते ही दूषित बनले आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्मान झाला होता. याबाबात ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे संबंधित दूषित पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

त्यानुरुप आज सकाळी दहा वाजता पाण्यात बसुन आंदोलनाला सुरवात केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने त्याठिकाणी जेसीबी मशिन आणुन चारी खोदण्यास सुरवात केली. दरम्यान पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली. मात्र जोपर्यत काम पूर्ण होत नाही तोपर्यत पाण्यातच बसुन राहण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. यामुळे संध्याकाळी बातमी लिहित असे पर्यत आंदोलन चालुच होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune marathi news baramati polluted water logging