हडपसर ते सासवडमार्गे जेजुरी रस्त्याची समस्या...; मार्गालगतची गटारे गायब 

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

  • पुरंदरच्या राज्यमार्गालगतची गटारे झाली `व्यावसायिकते`तून गायब 
  • पावसाचे पाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार
  • रुंदीकरणानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला अजूनही दुभाजकांचा विसर 

सासवड, (श्रीकृष्ण नेवसे) : हडपसर ते सासवडमार्गे जेजुरी एमआयडीसी अशा 41.06 किलो मीटरच्या अंतराच्या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण काही अंशी काम राहून थांबले आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत झाल्याने व शेतकऱयांच्या हरकती असल्याने थांबले. मात्र या रस्त्याला सासवड, जेजुरी व इतर गावठाणांच्या ठिकाणी बाजूची गटारे, चाऱया न ठेवल्याने थोड्या पावसानेही पाणी रस्त्यावर येते. त्यातून रस्त्याचे नुकसान होतेच. शिवाय अपघाताचा धोका गावठाणांच्या ठिकाणी वाढला आहे. त्यात दुभाजकच रस्त्याला नसल्याने अपघातात भरच पडत आहे.  

सासवड (ता. पुरंदर) हे शहर पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण. त्यामुळे या शहराच्या हद्दीत राज्य महामार्गाचा सुमारे चार कि. मी. हून अधिकचा भाग येतो. येथे विविध हाॅटेल, विविध व्यवसायिक, रस्त्यावरील विक्रेते यांनी रस्त्यालगच्या गटारींचा किंवा चारीचा मागमूसही ठेवला नाही. हळू हळू करीत ही गटारे गायब करुन त्याचे धंद्यांच्या सोयीसाठी सपाटीकरण झाले. त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला, तरी हे पाणी अनेक ठिकाणी थेट राज्य महामार्गावर वाहून येते. ते पाणी साठून व त्यावर जडवाहने जाऊन डांबरीकरण खराब होते, खड्डे लवकर पडतात. साठलेल्या पाण्याने वाहन चालक अचानक मध्यभागी येतात. त्यातून अपघातांचा धोका वाढला आहे. हाच प्रकार जेजुरी व इतर गावठाणांच्या ठिकाणी पाहण्यास मिळतो आहे. बाजूने येणारे व रस्त्यावरील पाणी जाण्यास वाव न राहील्याने हा त्रासदायक प्रकार आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट आहे. 
  
तसेच या राज्य महामार्गाचे बरेच ठिकाणी रुंदीकरण झाले. त्यासाठी सासवड, जेजुरी, फुरसुंगी या पट्ट्यात 15 कोटींच्या खर्चासह रुंदीकरण व विशेष दुरुस्त्या झाल्या आहेत. मात्र रुंदीकरण जिथे होईल, तिथे दुभाजक व सूचना फलकांची नितांत गरज असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विस्तारलेल्या रस्त्यावर गरज असूनही दुभाजक न लावल्याने अपघात वाढल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या किचकट अटीने कोणीच घेण्यास तयार नसल्याचे समजले. त्यामुळे मुरुम टाकून महामार्गावरील खड्डे बुजविण्याची नामुष्की खात्यावर आल्याचे या आठवड्यात पाहण्यास मिळाले. हरकती घेतलेल्या शेतकऱयांचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून नोटीसा, सुनावणी, संयुक्त मोजणी, योग्य मोबदला, जागा हस्तांतर वा ताबा प्रक्रीया सुरु केली पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.  

महामार्गावर सुधारणा, दुभाजक, रिफ्लेक्टर, फलक हवेत..
अपघाती धोका लक्षात घेता.. हडपसर ते सासवडमार्गे जेजुरी या रस्त्यावर थोड्या सुधारणा, दुभाजक, रिफ्लेक्टर, फलक यांसाठी त्वरेने तरतूद व्हायला हवी. अन्यथा रस्ते अपघातात मागिल आठवड्यात एकाचदिवशी पाच बळी गेले. हा धोका वाढेल, असे मत व्यक्त होत आहे. 

Web Title: pune marathi news hadapsar saswad jejuri road issues