रोजगाराबाबत देशात उदासीनता; सुधारणा आवश्यक- वेंकटेशन

रोजगारनिर्मिती आवश्यक
रोजगारनिर्मिती आवश्यक

पुणे : "गेल्या तीन दशकांमध्ये रोजगारनिर्मितीसाठी आवश्‍यक अशी आर्थिक अर्थिक परिसंस्थेची निर्मितीच झालेली नाही. सरकार कोणतेही असो, रोजगारनिर्मितीचा प्रश्‍न मात्र कायम राहिला आहे. सध्याही तीच परिस्थिती कायम आहे. यामुळेच देशात सध्या दोन कोटी लोकांना रोजगाराच्या समस्या भेडसावत आहे,'' असे मत भारत युवा शक्ती ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त लक्ष्मी वेंकटेशन यांनी व्यक्त केले.

ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात वेंकटेशन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ट्रस्टतर्फे तरूण उद्योजकांना घडविण्यासाठी सुरू असणाऱ्या कार्यक्रमांबद्दल माहिती त्यांनी दिली. यावेळी संस्थेचे धोरण समिती अध्यक्ष सुनील मलकानी, 'युथ बिझनेस इंटरनॅशनल' या आंतराष्ट्रीय पुरस्कारासाठी भारतातून नामांकन मिळालेले सदाशिव मस्कले आणि इतर उद्योजक उपस्थित होते. युवा उद्योजक तुषार मुनोत यांनी कमी भांडवलातून दीडशे कोटी रुपयांपर्यंत उद्योग वाढविल्याचे उदाहरण वेंकटेशन यांनी यावेळी दिले.

मागील काही वर्षांत एक कोटी रोजगार निर्माण होण्याची गरज होती. आता ही गरज अधिक वाढली आहे. येत्या काळात 2 कोटी रोजगार निर्माण करण्याची आवश्यकता भासेल. परंतु, त्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी खंत लक्ष्मी वेंकटेशन यांनी व्यक्त केली.  

भारतीय अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपण गरिबीत दिवस काढले आहेत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींच्या अर्थमंत्र्यांमुळे मात्र देशातील जनतेला लवकरच जवळून गरिबी पहावी लागेल असे दिसत आहे, अशी सणसणीत टीका सिन्हा यांनी मोदी सरकारवर नुकतीच केली. तसेच, देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीस याआधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) नेतृत्वाखालील सरकारला जबाबदार धरता येणार नाही. निव्वळ 'काँग्रेस'ला दोष देणे आता थांबवा, असे सांगत त्यांनी भाजपवर पुन्हा नव्याने हल्ला केला. याबाबत विचारले असता वेंकटेशन यांनी वरील मत व्यक्त केले. 

वेंकटेशन म्हणाल्या, "गेली 25 वर्षे स्वयंसेवी संस्था ओरडून रोजगारनिर्मितीची गरज असल्याचे सांगत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्या त्या भागातील गरजांना लक्षात घेऊन त्यानुसार उद्योगाचे नियोजन करणे आवश्‍यक असते. केवळ योजनांच्या सहाय्याने रोजगार निर्मिती होत नाही. त्यासाठी स्थानिक नागरिकांच्या संकल्पनांना विचारात घेतले पाहिजे. त्यांच्यातील योग्य त्या व्यक्तीला उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यातूनच उद्योजकता विस्तृत प्रमाणात विकसित होईल आणि रोजगारनिर्मितीला अधिक चालना मिळेल.''

उद्योजकतेला चालना देण्यामध्ये आर्थिक पाठबळ, नैतिक मार्गदर्शन (मेंटॉरिंग) हे दोन महत्वपूर्ण घटक ठरतात. संस्थेतर्फे नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी या दोन्ही गोष्टी उपलब्ध केल्या जातात. गेल्या पंचवीस वर्षात ट्रस्टने सुमारे साडेपाच हजार उद्योजक घडविले आहेत. तसेच या उद्योजकांमार्फत अडीच लाख नगरिकांसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com