बिबट्या सदृश्य प्राण्याच्या वावरामुळे माळवाडीत घबराट

गणेश बोरुडे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट दिली. आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती आणि प्राथमिक अंदाजावरुन तरी तो बिबट्या नसून निशाचर तरस असावा. २ दिवस सादर परिसरात थांबून निरीक्षण करण्याचे आदेश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये.
- रणजित देसाई (तहसीलदार, वडगाव मावळ)

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य हिंस्र  प्राणी दिसल्याने माळवाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसीलदार, पोलीस, वनविभागाचे अधिकारी तसेच प्राणीमित्र कार्यकत्यांनी रात्री उशिवरापर्यंत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या कि तरस याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

माळवाडी परिसरात राहणारा शुभम हिंगणे हा युवक आपल्या चारचाकी वाहनाने रात्री साडेदहाच्या सुमारास घराकडे चालला असता, सरकारी सिमेंट गोदामाजवळ वाहनाच्या उजेडात त्याला एक बिबट्या सदृष्य प्राणी मारलेले भक्ष्य ओढून नेताना दिसला. एकटा असलयाने त्रेधा तिरपीत उडालेल्या शुभमने मोबाईलमध्ये फोटो काढून, ही गोष्ट आपल्या भावाकरवी सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांना सांगितली. डोळस यांनी त्वरित पोलिसांना कळवल्याने अर्ध्या तासाच्या आत, मावळचे तहसीलदार रणजित देसाई, तळेगावचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील, वनरक्षक धर्मेंद्र सावंत, संदीप मुंढे, सुनील भुजबळ तसेच मावळ वन्यजीवरक्षक संस्थेचे निलेश गराडे, सागर कवळेकर आदींनी भेट देऊन स्थळाची पाहणी केली. तोपर्यंत प्राणी भक्ष्य जागेवरच सोडून पसार झाला होता.

शिकार करण्याची पद्धत आणि छायाचित्रावरुन तो प्राणी बिबट्या नसून, तरस असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला असला तरी, प्रत्यक्षदर्शी युवक मात्र त्याच्या उंची आणि आकारावरुन तो बिबट्याचा असल्याचा दावा करत असल्याने तर्कवितर्कांना परिसरात उधाण आले आहे. बिबट्या सदृश्य प्राण्याच्या वावराने माळवाडीत घबराटी चे वातावरण आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असे आवाहन केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune marathi news leopard like animal seen on talegaon chankan road