पुण्यात चहा पिताना धक्का लागल्याने भांडणातून तरुणाचा खून

बाबा तारे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

विद्यापीठ चौकाजवळ असलेल्या एका हाॅटेलबाहेर चहा घेत होते. तेथे रिक्षामधून दोन अनोळखी इसम उतरत असताना त्यातील एकाचा अख्तर यास धक्का लागला...

औंध (पुणे) : रिक्षातून उतरताना हाॅटेलजवळ चहा घेत असलेल्या तरूणाला धक्का लागून झालेल्या भांडणात रिक्षातून आलेल्या अज्ञात प्रवाशाने चाकू हल्ला केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज (सोमवार) सकाळी सव्वा सातच्या दरम्यान अख्तर खान (वय 22 वर्षे), अमजद नदाफ (वय 25 वर्षे), करीम सय्यद (वय 23 वर्षे) हे तिघेजण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळ असलेल्या एका हाॅटेलबाहेर चहा घेत होते. त्याचवेळी तेथे रिक्षामधून दोन अनोळखी इसम उतरले. उतरत असताना त्यातील एकाचा अख्तर यास धक्का लागला. यावेळी रिक्षातून उतरलेल्या इसमास अख्तरसह तिघांनी जाब विचारला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्याचवेळी रिक्षातून उतरलेल्या दोघांपैकी एकाने अख्तर खान व करीम सय्यद यांच्यावर चाकूने वार केले.

अख्तरच्या हातावर झालेले वार गंभीर होते. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. यावेळी अजून आपल्यावर वार होतील या भीतीपोटी जीव वाचवण्यासाठी अख्तर विद्यापीठ चौकातून बाणेर मार्गे रक्तबंबाळ अवस्थेत पळत निघाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने बाणेरकडून येणाऱ्या रस्त्यावर त्याचे रक्त पळताना पडत होते. विद्यापीठ चौकातील श्री हाॅटेल ते बाणेरकडून येताना माॅडर्न विद्यालयाच्या थांब्यापर्यंत जवळपास अर्धा किलोमीटर गेल्यावर अख्तरला चालणेही कठीण झाले. यावेळी तो त्या थांब्यावर थांबला असता अति रक्तस्त्राव झाल्याने याच ठीकाणी बेशुद्ध पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चतु:श्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे हे पुढील तपास करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune marathi news murder at pune university square