ग्रामीण भागातही डीजे, दांडियाचा फीवर

गणेश बोरुडे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

फॅशनेबल शहरी भागात गरब्याच्या ट्रेंडला राजकीय आणि सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झाल्याने प्रायोजक शोधावे लागत नाहीत. किंबहुना काही प्रतिष्ठेच्या बनलेल्या दांडिया महोत्सवात तरुण तरुणी महागडी तिकिटे काढून सहभागी होताना दिसतात.

तळेगाव स्टेशन : कधीकाळी केवळ घरातील घटस्थापना आणि देवीच्या मंदिरातील आरतीपर्यंत साजरा केल्या जाणाऱ्या मावळातील नवरात्रौत्सवाला गरब्यामुळे सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊन चौकाचौकात दांडियाचे खेळ रंगू लागले आहेत. सुरुवातीला मर्यादित तळेगाव,वडगाव,कामशेत,लोणावळ्यासारख्या शहरी भागपुरत्या मर्यादित असलेल्या डीजे दांडियाचे लोण आता थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचे चित्र मावळात पाहावयास मिळते आहे.

काळानुरुप शहरी भागातलं नवरात्रौत्सवाचे स्वरूप बदलत गेले असले,तरी ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक नवरात्रीची झलक पाहवयास मिळते. नऊही दिवस घट बसलेल्या गावातील देवीच्या मंदिरासमोर रात्रभर आरादी-गोंधळींचा जागर चालतो आणि पहाटे आरती. मात्र जसजसा डीजे दांडिया आणि गरब्याचा जोश शहरी भागात वाढत गेला तसतसे ग्रामीण भागातही दांडियाचा फिव्हर हळूहळू वाढू लागला आहे. शहरातल्या गरब्याप्रमाणे नटण्या खटण्याचा डोलमौल किंवा डीजेची मोठ्या आवाजातली धामधूम नसली तरी छोट्या आवाजातील गाण्यांच्या तालावर,रंगीबेरंगी पोशाख नसेल सामान्य गावठी पेहरावावर आणि मंद उजेडात ग्रामीण भागातली गावकरी तरुण मंडळीही दांडियावर ठेका धरु लागली आहेत.

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन आंदर मावळात दांडियाचे कार्यक्रम आयोजिले जात आहेत. नवरात्रीच्या नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्यात ग्रामीण भागातील जरा आर्थिक सधन कुटुंबातील स्रियांमध्येही रस दिसून येतोय. फॅशनेबल शहरी भागात गरब्याच्या ट्रेंडला राजकीय आणि सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झाल्याने प्रायोजक शोधावे लागत नाहीत. किंबहुना काही प्रतिष्ठेच्या बनलेल्या दांडिया महोत्सवात तरुण तरुणी महागडी तिकिटे काढून सहभागी होताना दिसतात. इकडे ग्रामीण भागात मात्र केवळ कला आणि मनोरंजनाचे प्रतीक म्हणून फारसा डोलमौल न करता छोट्या स्पीकरवर लावलेल्या गाण्यांच्या तालावर टिपऱ्या खेळण्याचा निखळ आनंद घेताना ग्रामीण भागातील युवक दिसतात. अगदी घटस्थापनेपासून दांडिया खेळला जाऊन कोजागरी पौर्णिमेला मसाला दुधाची खुमारी चढलेली ग्रामीण भागातही दिसून येतेय. एकंदरीतच सण,परंपरा दिवसागणिक बदलणारे संगीत,फँशनचे ट्रेंड आणि मौज ही फक्त शहरी विभागाचीच मक्तेदारी राहिली नाही. हौसेला मोल नसते म्हणतात त्याप्रमाणे निमशहरी तसेच ग्रामीण भागातही जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे बदलते सणोत्सव सेलिब्रेट करुन आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. फरक एवढाच कि शहरासारखा फॅशनचा मुलामा त्याला अद्याप तरी दिला गेला नसल्यामुळे निखळ आनंद उपभोगण्यापलीकडे तो गेलेला नाही.

Web Title: pune marathi news navratri festival dandiya dance fever