कचराकुंड्या ओसंडून वाहताहेत, नुसते हातात झाडू घेऊन काय मिरवताय...?

मिलिंद संधान
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

ऐन पाऊसाळ्यात महापालिकेच्या बेफिकिरीमुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी सुटून सामान्यांना साथीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे.

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु अशा वेळी लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागाला धारेवर धरण्याऐवजी तेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मिरवण्यात मशगुल झाले आहेत," अशी टीका पिंपळे गुरवचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून कचराकुंड्यामधील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याबद्दल जगताप यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत आपला संताप व्यक्त केला.

नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात शनी मंदिर, मयुरनगरी, काटेपुरम चौक, रामकृष्ण चौक, पीडब्ल्युडी मैदान परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील कचरा वेळेवर न उचलल्याने कचराकुंडी भोवतालीचा संपुर्ण भाग कचरामय होऊन त्यात भर म्हणून की काय मोकाट जनावरे, कुत्र्यांचा उपद्रव आणखी वाढतो. त्यातच ऐन पाऊसाळ्यात महापालिकेच्या बेफिकिरीमुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी सुटून सामान्यांना साथीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेवून कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली.  

स्थानिक नगरसेविका माधवी राजापुरे म्हणाल्या, "पूर्वीच्या क आणि ड प्रभागामुळे कचरा संकलन केंद्र संदिग्ध अवस्थेत होते. त्यात आता हा भाग 'ह' प्रभागात आला. परंतु ह प्रभागाला स्वतःचे कचरा उचलण्याचे वाहन नाही. त्यामुळे नियमित नाही, परंतु एखाद्या दिवशी गाड्यांच्या अडचणीमुळे कचरा समस्या उद्भवतेय. त्यातच छोट्या घंटा गाड्या या गल्लोगल्लीतील कचरा उचलण्यास कमी पडत आहे, त्यासाठी मोठ्या गाड्या घेण्याच्या विचारात महापालिका आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल."

जिथे कचरा नाही तेथे हातात झाडू घेऊन सफाईचे देखावे करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच तोंडावर आलेल्या दिवाळी दसऱ्याच्या सणाला तरी हे खड्डेमय रस्ते, डास व घाणीचे साम्राज्य दिसू नये अशी अपेक्षा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.    

Web Title: pune marathi news pimple gurav garbage issue