येथे 15 वर्षांपासून सतत दगावताहेत दुभती जनावरे...

रामदास वाडेकर
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

इतक्या मोठ्या नुकसानीला सामोरे जाताना धनगर बांधव मेटाकुटीला आला आहे. इतके वर्ष लोटूनही तो हे नुकसान संयमाने घेत आहे, पठारावर राहून पोट भरणार नाही, हे हेरून तो घराबाहेर नोकरी शोधू लागला आहे. 

टाकवे बुद्रुक : दुभत्या गाई म्हशी, वासर आणि पाडसं, औताची बैल अकस्मिकपणे मरत आहेत, मागील पंधरा वर्षांपासून सतत दगावणाऱ्या पशूधनाने धनगर पाड्यावरील बांधवांचे कंबरडे मोडले आहे. समजून न येणार्‍या या रोगाने पशुधन संपुष्टात येत आहे, जनावरांच्या गळ्यातील घंटा वाजून गजबजलेले सह्याद्रीचा कडेपठार पशुधनाअभावी ओस पडला आहे.

पंधरा वर्षांपूर्वी अकस्मितपणे दुभती जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी 'सकाळ'ने ही व्यथा मांडली होती. याची तातडीने दखल घेत पशू वैद्यकीय अधिकारींची डोंगरावर रीघ लागली होती.त्यात पद्धतीने आताही जनावरे पटापट दगवू लागली आहे, इतक्या मोठ्या नुकसानीला सामोरे जाताना धनगर बांधव मेटाकुटीला आला आहे. इतके वर्ष लोटूनही तो हे नुकसान संयमाने घेत आहे, पठारावर राहून पोट भरणार नाही, हे हेरून तो घराबाहेर नोकरी शोधू लागला आहे. 
सह्याद्रीच्या डोंगरात करंजगाव पठार ते कुसुर पठारावर ठिकठिकाणी धनगर पाडयावर जनावरे दगाविण्याच्या घटनेने घरात चहाला दुधाचा थेंब मिळेना झाला आहे, गोठयात जनावर राहत नसल्याने धनगर वस्त्या बेघर होऊ लागल्या आहेत. तरूण पिढी नोकरी धंद्यासाठी पाडा सोडून शहराकडे धाव घेत आहे. उपासमारी पेक्षा घरा बाहेर पडून नोकरी शोधलेली बरी असा पाडा बोलू लागला आहे. हे सर्व धनगर बांधव गाई, म्हशी संभाळून भात, नाचणी, सावा, वरईची पिके घेतो. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने होत असायची, जनावरे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने शेणखत ही मिळत नाही.

या न समजणार्‍या रोगात जनावराचे पुढचे पाय पूर्णपणे गळून जातात ताप येतो, तोंडातून लाळ सुटते. शारीरीक क्रिया पूर्ण बंद होऊन छातीमध्ये सूज येते व पुढील ३ त ४ तासात जनावर दगावलेल्या.असा हा आजार असून हा आजार या परिसरात पंधरा ते वीस वर्षे झाले असून तसाच आहे, त्यावर अद्याप निदान ही झाले नाही आणि उपचार ही नाही, आता पर्यंत शेकडो जनावर दगावली आहे. तिन्ही ऋतूमध्ये जनावरांना जडणारा हा आजार दुधती गाय, धष्टपुष्ट जनावरांना लगेच जखडला जातो. करंजगाव पठार , वडेश्वर पठार, कुसुर पठार, उकसान पठार, कुसवली पठार, कांब्रे पठार , जांभवली, शिरदे, थोरण या भागात मोठ्या प्रमाणात याने थैमान घातले आहे. त्यामुळे आज तरी औताला बैल व दुधासाठी गायी राहिल्या नाही. 

यापूर्वी पशूवैद्यकीय अधिकारींनी शवविच्छेदन करून पुढील तपासणी साठी घेऊन गेलेल्या नमुन्यात काय निष्पन्न झाले याचीही माहिती दिली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.दरम्यान, रानावनात चरणारी जनावरे गवता सोबत विशेषत: उन्हाळ्यात माती ही खात असावीत, मातीने अनावश्यक घटक पोटात गेल्याने काही दिवस किंवा महिने लोटल्यावर ही व्याधी उफाळून येत, आणि त्यात जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढते असा निष्कर्ष पंधरा वर्षी पूर्वी तात्कालिन पशू वैद्यकीय अधिकारींनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता.

निवडक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
रामभाऊ जानकर (कांब्रे पठार) म्हणाले, " माझ्या कडे लहान मोठी ३० ते ४० जणांवर होती. पण आज माझ्याकडे चहासाठी दूध नाही सर्व जनावर या आजारात मरून गेली .
पांडूरंग हिरवे (कांब्रे पठार) म्हणाले, " माझा औताचा बैल दगावला, ऐन लावणीत बैल मेल्याने लावणीचं करता आली नाही बैल नसल्याने माझ्या भाताची रोपे कुजून गेली, त्यामुळे भात पिक ही हातचे गेले, बारा महिने काढायचे कसे? 
नामदेव शेडगे (उकसान पठार) म्हणाले, "माझा बैल त्याच आजाराने आजारी पडल्यावर तर मी डॉक्टर फोन केला, तर त्यांनी गावाला आहे असे सांगितले, त्यांना विचारले की मला इंजेक्शन चा नाव द्या तेव्हा त्यानी मला नाव दिल व मी स्वतः मेडिकल मधून औषध इंजेक्शन आणून मारलं त्यामुळं माझा बैल बचावला.

Web Title: pune marathi news takve dhangar pada