Pune:ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या; अन्यथा सोमवार पासून मार्केट यार्ड बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune Market Yard Protest

Pune:ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या; अन्यथा सोमवार पासून मार्केट यार्ड बंद

पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही अडत्यांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा.

अन्यथा सोमवार (ता.१७) पासून बाजार समितीमधील व्यवहार बेमुदत बंद ठेवण्यात येतील असा इशारा बाजार समितीमधील अडते संघटनेसह विविध कामगार संघटनांनी दिला आहे. याबाबतची बैठक गुरुवारी मार्केट यार्डातील जय शारदा गणेश मंदिरात पार पडली.

मार्केट यार्डातील अडते असोसिएशनसह विविध संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे पोलीस आयुक्त यांना याबाबतचे सामुहिक निवेदन दिले आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी बाजार आवारातील बेकायदा लिंबू विक्री करणाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमण कारवाई केली होती.

हि कारवाई पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यावेळी कोणतीही तक्रार आणि गुन्हे दाखल न करता सहा महिन्यांनी गुन्हे का दाखल करण्यात आले असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे.

खोटे गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ बाजार आवारातील विविध संघटनांनी एकत्र येऊन बैठक घेतली. यावेळी अडते असोसिएनशनचे अध्यक्ष बापू भोसले, सचिव करण जाधव, उपाध्यक्ष सौरभ कुंजीर, महेश शिर्के,

अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे, शशिकांत नांगरे, ज्येष्ठ अडते गणेश घुले, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, अडते असोसिएशनचे संचालक रोहन जाधव, आप्पा कोरपे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेकायदेशिर लिंबू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करताना कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. अधिकारी, कर्मचारी, अडत्यांवर दाखल झालेला गुन्हा खोटा आहे.

बाजार आवारातील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईसाठी आम्ही विविध संघटना आग्रही होतो. प्रशासनाने हा खोटा गुन्हा तातडीने मागे घ्यावा. अन्यथा सोमवार (ता.१७) पासून मार्केट बेमुदत बंद करण्यात येईल.

- बापू भोसले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन

बाजारात आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशिर लिंबू विक्री करणाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाई केली आहे. हि कारवाई पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन केली आहे. मात्र कारवाई करताना खोटे गुन्हे दाखल करणे हे प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होणारे आहे. त्यामुळे तातडीने गुन्हे मागे न घेतल्यास सोमवार (ता.१७) पासून बाजार बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे.

- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन