महापौरांचा पीएमपीतून प्रवास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

‘पुण्यातील वाहतूक प्रश्‍नाला प्रथम प्राधान्य देईन’, पुण्याच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर ‘सकाळ कार्यालया’ला दिलेल्या भेटीत मुक्ता टिळक यांनी पुणेकरांना आश्‍वासन दिले आणि दिलेला शब्द खरा करत लगेच दुसऱ्या दिवशी ‘पीएमपी’ने कात्रज ते स्वारगेट असा प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत कशी असते, हे त्यांनी अनुभवलेसुद्धा...

पुणे - एक आलिशान गाडी सकाळी पावणेदहा वाजता कात्रज बस स्थानकाजवळ थांबली. या गाडीतून एक व्यक्ती उतरली अन्‌ सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. प्रवासी त्यांच्याभोवती जमा झाले. या प्रत्येकाशी ती व्यक्ती आपुलकीने संवाद साधू लागली. त्यांच्या समस्या जाणून घेऊ लागली. पुढे ती व्यक्ती बसमध्ये बसून प्रवाशांशी स्वतःहून बोलू लागली. प्रवासीही आपल्या समस्या कोणी तरी जाणून घेत आहे, हे पाहून भारावून गेले. ती व्यक्ती म्हणजे पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक.

कात्रज बस स्थानकाच्या डोक्‍यावर असलेला वाहनतळ अजूनही अर्धवट बांधलेल्या स्थितीत असून बंद आहे, याची पाहणी करून महापौरांनी बस स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांनी संवाद साधायला सुरवात केली. मात्र महापौरांशी बोलायचे कसे, असे अनेकांना वाटते होते; पण ‘‘काय आजोबा, बस मिळते का वेळेवर...’’, ‘‘अहो ताई, तुम्हाला बसमधून जाताना काय अडचणी जाणवतात?...’’ ‘‘काय मुलींनो, बसमध्ये जागा मिळते का?... सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कुठल्या सुधारणा व्हाव्याशा वाटतात?...’’ असे विचारत त्यांनी प्रवाशांना बोलते केले आणि त्यांच्याकडून अडचणी समजून घेतल्या.

तेवढ्यात बस स्थानकावर कात्रज-शिवाजीनगर बस येऊन थांबली. महापौर बसमध्ये शिरल्या आणि त्यांनी तिकीटही काढले. त्या बसमध्ये आल्याचे पाहून अनेक प्रवाशांना आश्‍चर्य वाटले; पण या प्रत्येक प्रवाशाशी संवाद कसा साधता येईल, याकडे त्या लक्ष देत होत्या. सकाळची वेळ असल्यामुळे मार्गावरील प्रत्येक थांब्यावर बसमध्ये गर्दीचा लोंढा वाढत होता. तरीही गर्दीतून मार्ग काढत कधी ज्येष्ठ नागरिकांशी, तर कधी महिलांशी, कधी विद्यार्थ्यांशी व कधी कंडक्‍टरसोबत महापौर बोलत होत्या. 

अलका धुमाळ, अंजली गुरव, भाग्यश्री यादव, विजया शेजवळ या महिलांच्या ग्रुपमध्ये महापौर सहभागी झाल्या. ‘‘काय वाटते बसमधून प्रवास करताना?’’ या प्रश्‍नाला उत्तर देताना महिलांनी अडचणींचा पाढाच वाचला. ‘‘आम्ही दररोज सकाळी ऑफिसला जातो; पण बस वेळेवर येतेच असे नाही. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे लोक धक्के देतच बसमध्ये येत असतात. काही विचारले तर उलट आम्हालाच ‘तुम्ही तुमच्या गाडीने जा ना’ असे ऐकवले जाते. महिलांच्या जागेवर पुरुष बसतात. त्यामुळे महिलांच्या ‘स्पेशल बस’ची संख्या वाढवायला हवी...’’ महिलांची ही व्यथा जाणून घेऊन महापौर बसमधील विद्यार्थ्यांकडे वळल्या. 

ज्येष्ठ नागरिक दिगंबर शेजवळ म्हणाले, ‘‘बसचा गरगर आवाज मोठ्या प्रमाणात येतो. अशा नादुरुस्त बसकडे प्रशासनातील कोणी लक्ष देते का? इतकेच नव्हे तर बसची साफसफाईही वेळेवर होत नाही. सीट धुळीने माखलेली असतात. त्यामुळे प्रवाशांचे कपडे खराब होतात. बस वाटेतच बंद पडतात. त्या ढकलाव्या लागतात. या सगळ्या गोष्टींची पाहणी करणारे पथक नेमाल का?’’ ही मागणी महापौर ऐकून घेत होत्या. ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये यायला काही वेळ लागतो; पण तोपर्यंत चालक बस थांबवत नाही. म्हातारी माणसे खाली पडतात, हा अनुभवही त्यांनी महापौरांना सांगितला.

जवळपास अर्धा तास चाललेला हा प्रवास स्वारगेट चौकात येऊन थांबला. महापौर बसमधून खाली उतरल्या. तेथेही प्रवाशांची त्यांच्याभोवती गर्दी जमा झाली. अतिक्रमणाचा वाहतुकीला बसणारा फटका, रिक्षांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, बस स्थानकांची स्थिती, तेथे असलेली दुर्गंधी, शेड धड स्थितीत नसल्याने प्रवाशांवर उन्हात उभे राहण्याची आलेली वेळ... या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. इतकेच नाही तर ‘ही स्थिती आपण एकत्र मिळून बदलू’, असे आश्‍वासन देत त्या महापालिकेकडे वळल्या.

नागरिक म्हणतात...
 ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्या मार्गांवर पुरेशा बस नाहीत
 अनेक बसची दुरवस्था झालेली आहे
 बस स्थानक परिसरात प्रचंड अस्वच्छता
 स्थानकात भिक्षेकऱ्यांचा वावर
 मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर 
 थांब्यांवर शेड नाहीत, आसनव्यवस्था नाही
 नियोजित वेळेनुसार त्या त्या मार्गांवरील बस सोडल्या जात नाहीत
 तासन्‌तास बसची प्रतीक्षा करावी लागते 
 थांब्यासमोर बस थांबत नाहीत
 खासगी वाहने, हातगाड्या बस स्थानकाच्या आवारात येतात 
 स्थानकाच्या शेजारीच रिक्षा उभ्या असतात
 कोंडीमुळे बस स्थानकात ये-जा अशक्‍य

Web Title: pune mayor mukta tilak travel pmp bus