धक्कादायक : पुण्याच्या महापौरांच्या कुुटुंबात 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

टीम ई-सकाळ | Sunday, 5 July 2020

आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील कोणालाही कोरोनाची लक्षणे नसल्याची माहिती आहे. त्यामुळे गरजेनुसार त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. गरज नसल्यास यातील बहुतांश जणांवर घरातच उपचार सुरू करण्यात येतील.

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आता त्यांच्या कुटंबातील जवळपास आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज, दुपारी या सगळ्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट आला आहे. विशेष म्हणजे, या आठही जणांना कोरोनाची लक्षणे नसल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल काल सायंकाळी आला होता. त्यात ते पॉझिटिव्ह आढळल्यामुळं त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहोळ पॉझिटिव्ह आढळल्यानं त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांचे स्वॅब काल सायंकाळी टेस्टिंगला पाठवण्यात आले होते. त्यात मुरलीधर मोहोळ यांचे वडील, आई, पत्नी, छोटी मुलगी, सख्खा भाऊ, भावाची बायको, बहीण, भाची  अशा आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील कोणालाही कोरोनाची लक्षणे नसल्याची माहिती आहे. त्यामुळे गरजेनुसार त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. गरज नसल्यास यातील बहुतांश जणांवर घरातच उपचार सुरू करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. मोहोळ यांचे संपूर्ण कुटुंब पुण्यात कोथरूडमधील मयूर कॉलनीत राहते. एकाच इमारतीत वेगवेगळ्या फ्लोअरवर हे कुटुंब राहते. त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार करणे शक्य असल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत अद्याप कोणतिही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

आणखी वाचा - सासवडकर झाले भयभीत

कोरोना विरुद्ध लढा
पुण्यात ९ मार्चला कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे अवघे शहर हदरले आणि कोरोनापासून पुणेकरांचा बचाव व्हावा यासाठी महापौर मोहोळ यांनी आरोग्य यंत्रणांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे मात्र, कोरोनाचा आवाका वाढतच राहिल्याने सगळ्या यंत्रणा तोकड्या ठरण्याची भिती होती. तरीही कोरोनाचा अटकाव करण्यासाठी महापौर मोहोळ हे रस्त्यावर उतरुन स्वत: उपाययोजना आखत होते. संपूर्ण शहाराचा आढावा घेत महापौर मोहोळ दिवसात ८ ते १० बैठका घेण्याचा सपाटा लावत होते. त्याशिवाय महापालिकेच्या नायडूसह खासगी रुग्णालयातील माहितीही घेत राहिले. तसेच रुग्णांना आवश्यक असलेल्या सूचनाही देत होते.