पुण्याचा महापौर तयारीचाच हवा!

BJP
BJP

रोमॅंटिक म्हणून गाजावाजा झालेल्या चित्रपटासाठी जावं अन्‌ प्रत्यक्षात तो ‘सस्पेन्स थ्रिलर’ निघावा, अशी अवस्था सध्याच्या सत्तासंघर्षाची झाली आहे. ‘राज्यात सत्ता नेमकी कोणाची?’ याचा तिढा सोडवताना, त्याच समांतर पातळीवर पुण्या-मुंबईसह राज्यातील २७ महापालिकांचे महापौर या आठवड्यात निवडले जाणार आहेत. ‘महाशिवआघाडी’ सत्तेवर येण्याची तयारी पाहता, चार ते पाच शहरांमध्ये सत्तांतराची शक्‍यता वर्तविली जात आहे. याचा पुण्यात फारसा फरक पडणार नसला, तरी राज्यात होणारा सत्ताबदल, पुढील महापालिका निवडणुका लक्षात घेऊन संपूर्ण शहराचे नेतृत्व करू शकेल असा सक्षम चेहरा भाजपला द्यावा लागणार आहे. गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून भाजप या वेळी ‘परफॉर्मन्स’ दाखविणारा महापौर देणार का, हे यानिमित्ताने स्पष्ट होईल.

राजकारणात ‘काहीही’ होऊ शकते, याचा अनुभव सध्या राज्यातील जनता घेत आहे. सत्तास्थापनेसाठी अभूतपूर्व महाशिवआघाडी आकाराला येत आहे. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडणार आहेत. त्याला महापालिकाही अपवाद असणार नाहीत. या नव्या राजकारणाचे पडसाद कसे उमटू शकतात, याची तत्काळ चाचणी महापौरपद निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. पुण्यात भाजपचे ९९ नगरसेवक आहेत, त्यामुळे येथे कोणत्याही बदलाची शक्‍यता आहे. सध्या भाजपला बाहेरून पाठिंबा देणारी शिवसेना आता त्यांच्यासोबत राहणार नाही, मात्र त्याचा कोणताही परिणाम पुण्यात होणार नाही; पण यापुढे पुणे महापालिकेचे राजकारण करताना भाजपला अत्यंत सावध राहावे लागणार आहे. 

महापालिका आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुणेकरांनी एकमुखी पाठिंबा दिला. मात्र हे यश विधानसभा निवडणुकीत टिकवता आले नाही. त्यामुळे वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघ भाजपला गमवावे लागले. खडकवासला आणि पुणे कॅंटोंमेंट मतदारसंघात निसटता विजय मिळाला. या बदलत्या किंवा भाजपविरोधात जाणाऱ्या वातावरणाचा विचार करूनच भाजपला महापौरपदाची निवड करावी लागणार, हे नक्की.

विधानसभा निवडणुकीत मतदान करताना पुणेकरांनी राज्याच्या राजकारणासोबतच स्थानिक प्रश्‍नांनाही महत्त्व दिले आहे. पुणे महापालिकेचा कारभार कसा सुरू आहे, याचे मूल्यमापनही त्यात झाल्याचे दिसते. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अडीच वर्षे आधी पुणेकरांनी भाजपला एकप्रकारे इशारेवजा संदेश दिला आहे. त्यामुळे कारभारात सुधारणा आणि गतीही अपेक्षित आहे. हे बदल घडवून आणण्याची क्षमता कोणाकडे आहे, असाच महापौर पक्षाला द्यावा लागणार हे तितकेच खरे आहे.

पुण्यात खासदार गिरीश बापट यांचे वर्चस्व आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विजयी झाल्याने त्यांचेही आता महापालिकेच्या कारभारावर लक्ष असणार. शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांना या वेळी मंत्रिपदाची शक्‍यता होती, पण राजकीय परिस्थिती बदलल्याने आता मिसाळ यांना शहरात अधिक लक्ष घालून पक्षाची आणखी पडझड होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. आता निवडला जाणारा महापौर हाच पुढील महापालिका निवडणुकीचा पक्षाचा चेहरा राहणार आहे. त्याचे पुढील अडीच-पावणे तीन वर्षांतील कामावरच पक्षाच्या कामगिरीचे मूल्यमापनही होणार असल्याने ही निवड विचारपूर्वक करावी लागणार आहे.

केवळ विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली किंवा नाही, दादांच्या किंवा भाऊंच्या जवळचा कोण?, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला ‘शब्द’ दिला होता यापेक्षा पुणे शहराला आकार देणारी, प्रलंबित विकासकामांना गती देणारी, राज्य सरकारसोबत योग्य समन्वय साधू शकणारी आणि केवळ स्वतःचा प्रभाग न पाहता संपूर्ण शहराच्या विकासाचा समतोल साधणारी व्यक्तीच महापौरपदी बसवावी लागणार आहे. मग त्यात जुना किंवा नवा हा निकष लावण्यापेक्षा काम करून घेणारा चेहरा निवडणे भाजपला आवश्‍यक ठरणार आहे; अन्यथा शंभराचे पंचवीस व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अडकलेल्या नेत्यांना महापौरपदाची निवडही तेवढीच गांभीर्याने घ्यावी लागेल, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com