शहरातील वैद्यकीय सेवा पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुणे - "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) राज्य शाखेतर्फे बुधवारी संध्याकाळपासून पुकारलेले बेमुदत वैद्यकीय सेवा बंदचे आंदोलन शुक्रवारी संध्याकाळी मागे घेण्यात आले. त्यामुळे शहरातील बाह्य रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एक्‍स-रे सुविधा पूर्ववत सुरू झाल्या.

पुणे - "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) राज्य शाखेतर्फे बुधवारी संध्याकाळपासून पुकारलेले बेमुदत वैद्यकीय सेवा बंदचे आंदोलन शुक्रवारी संध्याकाळी मागे घेण्यात आले. त्यामुळे शहरातील बाह्य रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एक्‍स-रे सुविधा पूर्ववत सुरू झाल्या.

राज्यातील चौदा वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्‍टरांनी सोमवारपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी "आयएमए'ने राज्यातील वैद्यकीय सेवा बुधवारी रात्रीपासून बंद केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि "आयएमए'चे राज्य प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यातून निवासी डॉक्‍टरांच्या सुरक्षेचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संध्याकाळी "आयएमए'तर्फे कळविण्यात आले.

या "आयएमए'च्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या तासाभराच्या चर्चेमध्ये निवासी डॉक्‍टरांच्या सुरक्षेचे प्रश्‍न मांडले. यातून समाधानकारक तोडगा निघाला. त्यामुळे "आयएमए'ने बंद मागे घेण्याचा निर्णय संध्याकाळी घेतला. वैद्यकीय सेवा बंद करून रुग्णांना वेठीस धरणे हा उद्देश नव्हता. तर वैद्यकीय क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सरकारने वेळ द्यावा, त्याकडे गांभीर्याने पाहावे, असा उद्देश होता.''

"आयएमए'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांसोबत यशस्वी चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी बंद मागे घेतल्यानंतर शहरातील वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू झाली. सकाळपासून बंद असलेला बाह्यरुग्ण विभाग संध्याकाळी सुरू झाला होता.'

Web Title: pune medical service continue