मेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर आता मेट्रो या कुटुंबांचे सामाजिक स्तराचे सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिती मेट्रो कंपनीचे भूसंपादन अधिकारी प्रकाश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर आता मेट्रो या कुटुंबांचे सामाजिक स्तराचे सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिती मेट्रो कंपनीचे भूसंपादन अधिकारी प्रकाश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मेट्रोचे वनाज ते रामवाडी आणि पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट अशा दोन मार्गांचे काम सुरू आहे. या मार्गांत काही घरे आणि दुकाने बाधित होत आहे. यासंदर्भात सेंटर फॉर मार्केट रिसर्च या संस्थेने "सोशल इम्पॅक्‍ट स्टडी' (सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास) केला होता. या संस्थेच्या सर्वेक्षणाची माहिती कदम यांनी दिली. 

""या दोन्ही मार्गांत 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. शिवाजीनगर येथील कामगार वसाहत, तोफखाना, पौड रस्त्यावरील बाल तरुण मंडळ येथील झोपडपट्टी, मध्यवर्ती भागातील काही घरे, दुकानांचा त्यात समावेश आहे. कसबा पेठ आणि मंडई परिसरातील 246 मिळकतींचा यात समावेश आहे. फडके हौद, श्रीनाथ चित्रपट गृहाजवळ, स्वारगेट येथील दुकानांच्या ठिकाणी मेट्रो स्टेशनसाठी जागा हवी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळील 28 दुकाने स्थलांतरित करावी लागणार आहेत,'' असे कदम यांनी नमूद केले. 

या संस्थेच्या सर्वेक्षणानंतर मेट्रो एक जूनपासून स्वत: सर्वेक्षण करणार असून, त्यासाठी तीन ते चार पथक तयार केली जातील. मेट्रोची ही पथके घरोघरी, दुकानदारांकडे जाऊन त्यांचा सामाजिक स्तर, उत्पन्नाचे मार्ग असा प्राथमिक पातळीपर्यंतची माहिती गोळा करणार आहे. झोपडपट्टीतील घरांचे पुनर्वसन हे झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. इतर मिळकतींना मेट्रोच्या कायद्यानुसार रेडीरेकनरच्या दराच्या अडीच पट नुकसान भरपाई दिली जाणार आहे. 

सिमेंट, पाणी वाहून गेल्यानेच तो खांब तोडला 
नदीपात्रात डेक्कन येथे मेट्रोमार्गासाठी उभारलेला खांब पाडल्याबाबत प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी अधिक माहिती दिली. कॉंक्रिटीकरण केल्यानंतर खांबाच्या भोवती उभ्या करण्यात आलेला लोखंडी चौकटीतून सिमेंट आणि पाणी वाहून गेले होते. त्यामुळे हा खांब धोकादायक झाला असता. त्यामुळे तो पाडला. त्याचा पाया चांगला असल्याने तेथे पुन्हा खांब उभा केला जाईल. सध्या खांबांचे काम प्रगतिपथावर आहे. ते संथगतीने होत नाही, असा दावाही त्यांनी केला. आनंदनगर, आयडीएल कॉलनी, डेक्कन जिमखाना येथे स्टेशनसाठी काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Pune Metro to conduct survey in Pune