मेट्रोवर 20 वर्षे कर्जाचा बोजा 

मंगळवार, 29 मे 2018

पुणे - मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे 6 हजार 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्यावर त्याची परतफेड प्रकल्प सुरू झाल्यावर पाच वर्षांनी सुरू होईल. त्यासाठी 15 वर्षांची मुदत असेल. कर्ज फेडण्यासाठी तिकिटाच्या उत्पन्नाशिवाय 40 टक्के महसूल अन्य मार्गांनी निर्माण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे. दरम्यान, एक वर्षात दोन्ही शहरांतील मेट्रो मार्गावर सुमारे 330 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 

शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये साकारत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी 11 हजार 555 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक सुमारे 600 मिलियन युरो, तर फ्रान्सची एएफबी या वित्त संस्थेकडून सुमारे 245 मिलियन युरो रक्कम मिळणार आहे. त्यातून सुमारे 6 हजार 300 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या कर्जाची परतफेडीची मुदत 20 वर्षे असेल. 

मेट्रोसाठीचा कर्जपुरवठा केंद्र आणि राज्य सरकारमार्फत तत्त्वतः मंजूर झाला आहे. आता प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. कर्ज करारावर एक महिन्यात स्वाक्षऱ्या होतील. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाला आणखी वेग येईल. 
-रामनाथ सुब्रह्मण्यम, संचालक, महामेट्रो 

यातून होणार कर्जाची परतफेड 
तिकिटाचे उत्पन्न, मुद्रांक शुल्क व्यवहारांवर एक टक्के अधिभार, शिवाजीनगर- स्वारगेटसारखी स्थानके व्यावसायिकदृष्ट्या विकसित करणे, स्थानकांवरील जाहिराती, बांधकासाठी प्रिमियम, मेट्रोला मिळालेल्या मालमत्ता व्यावसायिकदृष्ट्या विकसित करणे आदी 

केंद्र सरकारने दिलेला निधी 1954 कोटी 
राज्य सरकारने दिलेला निधी 1954 कोटी 
दोन्ही महापालिकांचा वाटा 28 कोटी 

भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत तसेच व्याजासाठी अतिरिक्त तरतूद 1516 कोटी 
मेट्रोवर झाले 330 कोटी खर्च 
- एप्रिलपर्यंत उपलब्ध झालेला निधी 560 कोटी 
- प्रकल्पावर खर्च झालेला निधी 330 कोटी (दोन्ही मार्ग उभारणे, जागा ताब्यात घेणे, भूसंपादन, प्रशासकीय खर्च आदी) 

मेट्रो प्रकल्पाचे पुढचे टप्पे 
- शिवाजीनगर-रामवाडी मार्गाची निविदा 15 दिवसांत 
- सात स्थानकांसाठी निधी उपलब्ध होणार - एक महिन्यात 
- भुयारी मार्गाचे काम सुरू होणार - एक महिन्यात 
- सिग्नलिंगच्या निविदा - दीड महिन्यात 

स्थानके पर्यावरण पूरक 
मेट्रोची एकूण 31 स्थानके पर्यावरणपूरक असतील. सौरऊर्जेचा वापर करून ही स्थानके विजेबाबत स्वयंपूर्ण होतील. प्रमुख स्थानकांशी फीडर सर्व्हिस म्हणून पीएमपीची सेवा संलग्न राहणार असून, कॅब, रिक्षांनाही त्यात वाव असेल. शेअरिंग सायकलचीही सुविधा त्यात उपलब्ध होणार आहे. 

(क्रमशः)

Web Title: pune metro Loan for 20 years on metro