मेट्रोचे डबे महामेट्रोच करणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे - पुणे मेट्रो रेल्वेसाठी डबे तयार करण्याचे काम आता महामेट्रोच करणार आहे. डबे तयार करणाऱ्या चीनमधील कंत्राटदार कंपनीने नागपुरातील कारखाना बंद केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. 

पुणे - पुणे मेट्रो रेल्वेसाठी डबे तयार करण्याचे काम आता महामेट्रोच करणार आहे. डबे तयार करणाऱ्या चीनमधील कंत्राटदार कंपनीने नागपुरातील कारखाना बंद केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. 

मेट्रोचे डबे तयार करण्याचा कारखाना उभारण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या तीन महिन्यांत ते पूर्ण होईल, असा विश्‍वासही दीक्षित यांनी व्यक्त केला. नागपूर मेट्रोसाठी डबे तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढण्यात आली होती. चीनमधील कंपनीने हे कंत्राट मिळविले होते. सरकारकडून कंपनीला कारखाना उभा करण्यासाठी जागा आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या. नागपूर मेट्रोप्रमाणेच इतर शहरातील मेट्रोचे डबे तयार करण्याचे काम मिळेल, अशी या कंपनीची अपेक्षा होती. हे काम न मिळाल्याने चीनमधील कंपनीने काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून, नागपूर मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर डब्याचे उत्पादन थांबविण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारला माहिती कळविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महामेट्रो डब्याचे उत्पादन करू शकते, असे कळविल्यानंतर केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोचे डबे हे महामेट्रोने तयार केलेले असतील. 

तीनशे कोटींची गुंतवणूक 
कारखाना उभा करण्यासाठी चीनच्या कंपनीला दिलेली परत जागा मिळणार असली, तरी प्रत्यक्षात तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक महामेट्रोला करावी लागणार आहे. डब्यांचा मुख्य भाग हा कारखान्यात तयार केला जाईल. इतर गोष्टी या छोट्या कंपन्यांकडून तयार करून घेतल्या जातील. 

मेट्रोसाठी डबे तयार करणारी देशातील महामेट्रो ही पहिलीच कंपनी ठरेल. आणखी काही शहरांत मेट्रोचे काम सुरू असल्याने त्यांच्यासाठी डबे तयार करण्याचे काम महामेट्रोला मिळू शकेल. 
- विश्‍वास दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो 

Web Title: Pune Metro Rail Corridor