अशी असेल शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रो (व्हिडिओ)

मंगेश कोळपकर
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुठा नदीखालून सुमारे 12 ते 15 मीटरवर मेट्रोचा भुयारी मार्ग साकारणार आहे. फडके हौद ते स्वारगेट दरम्यान 20 ते 28 मीटर खोल मेट्रोचा भुयारी मार्ग असेल. खोदाई करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्यामुळे पृष्ठभागावरील बांधकामांना कोणताही धोका नसेल, असे महामेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रमुख प्रमोद आहुजा यांनी सकाळशी बोलताना स्पष्ट केले आहे.

पुणे : जमिनीखालून 20 ते 28 मीटर खालून मेट्रोचा ट्युबच्या धर्तीवर दुहेरी भुयारी मार्ग साकारणार आहे. त्यासाठीच्या मशिनची किंमतच सुमारे 100 कोटी रुपये असेल ! भुयारी मार्गाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गाने मेट्रो असणार आहे. 

शहरातील वनाज - रामवाडी हा 15 किलोमीटरचा मार्ग एलिव्हटेड म्हणजे रस्त्यावर खांब उभारून त्यावरून मेट्रो धावेल, आशा स्वरूपाचा आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रोचा सुमारे 16 किलोमीटरचा मार्ग आहे. त्यातील पिंपरी ते शिवाजीनगर दरम्यानचा मार्ग एलिव्हटेड आहे. तर शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानचा सुमारे 6 किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. त्यात शिवाजीनगर, फडके हौद, बुधवार पेठ (मंडई) आणि स्वारगेट ही स्थानके आहेत.

मुठा नदीखालून सुमारे 12 ते 15 मीटरवर मेट्रोचा भुयारी मार्ग साकारणार आहे. फडके हौद ते स्वारगेट दरम्यान 20 ते 28 मीटर खोल मेट्रोचा भुयारी मार्ग असेल. खोदाई करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्यामुळे पृष्ठभागावरील बांधकामांना कोणताही धोका नसेल, असे महामेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रमुख प्रमोद आहुजा यांनी सकाळशी बोलताना स्पष्ट केले आहे.

फडके हौद स्थानकासाठी सुमारे 7 हजार चौरस मीटर जागा संपादीत करण्याची महामेट्रोची प्रक्रिया सुरू आहे. भुयारी मार्गात ट्यूब असेल. त्यात मेट्रोचे दोन मार्ग असेल. मुबलक प्रकाश योजना, हवा खेळती राहण्यासाठी विशेष योजना त्यात असेल. आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास त्यासाठी देखील विशेष व्यवस्था असेल, असे आहुजा यांनी स्पष्ट केले आहे. भुयारी मार्गासाठी सध्या स्वारगेट आणि शिवाजीनगर येथे काम सुरू झाले आहे. भुयारी मार्गाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Pune Metro Shivajinagar to Swargate metro route in Pune