Pune Metro : सावधान! पुरेशी काळजी न घेताच पुणे मेट्रोचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून दररोज ये- जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. बांधकाम सुरू असताना मेट्रोकडून सुरक्षिततेच्या निकषांचे पालन केले जात नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

पुणे : वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून दररोज ये- जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. बांधकाम सुरू असताना मेट्रोकडून सुरक्षिततेच्या निकषांचे पालन केले जात नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे तर, सर्व काळजी घेत असल्याचा दावा महामेट्रोचा दावा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यावर आता गर्डर टाकण्यात येत आहे. यासाठी अनेकदा लोखंडी खांब व संबंधित साहित्य सुमारे 12 ते 16 मीटर उंचीवर ठेवण्यात येते. परंतु, त्या खाली जाळ्या नसल्यामुळे ते साहित्य खाली पडले जाते. गेल्या दोन महिन्यांत तीन घटनांमध्ये लोखंडी खांब रस्त्यावरील वाहनांवर कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम ठेकेदाराला महामेट्रोने सुमारे एक लाख रुपयांचा दंडही केला आहे. तसेच ज्या नागरिकाच्या मोटारीचे नुकसान झाले आहे, त्याला नुकसान भरपाईही देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीही कर्वे रस्त्यावरच सुमारे 15 मीटर उंचीवरून पहार खाली रस्त्यावर पडली. सुदैवाने तेथून पादचारी अथवा कोणते वाहन जात नव्हते. अन्यथा गंभीर घटना घडली असती. महापालिकेच्या नियमानुसार इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या खाली जाळी (नेट) लावणे बंधनकारक आहे. हे काम रस्त्यावर सुरू असेल तर, ते अत्यावश्‍यक आहे. जाळी नसल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेचे अधिकारी दंड ठोठावतात. परंतु, मेट्रोसाठी हे नियम शिथिल केले आहेत का ?, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपट्टी वसुलीसाठी ‘टॉप १०’ यादी

या बाबत परिसरातील रहिवासी संजय देशपांडे म्हणाले, ""मेट्रो मार्गासाठी बांधकामाचे नियम आहे का ? वनाज ते आनंदनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कोठेही पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. तसेच मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू असताना, त्या खालून जाणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितता जोपासण्यासाठी कोणत्याही उपायोयजना केलेल्या नाहीत. वाहनांवरून जातानाही नागरिकांच्या मनात भीती असते.'' काम सुरू असल्याची चिन्हे, बॅरीकेडस अत्यावश्‍यक आहेत. त्यांचाही वापर होताना दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. रहिवासी संजय भावे म्हणाले, ""मेट्रो स्थानकासाठी आनंदनगरजवळ खांब उभारण्याचे काम सुरू झाले. परंतु, तीन महिन्यानंतरही त्यात काही प्रगती झालेली नाही. मेट्रोसाठी खड्डे खोदून ठेवले जातात. परंतु, त्याच्या बाजूला जाळी, बॅरीकेडस लावणे आदी उपाययोजनाही केल्या जात नाहीत.'' या बाबत महामेट्रोकडे तक्रार केली तरी दखल घेण्यात आली नाही, असाही अनुभव त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला.

या बाबत महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, "मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना, जाळी लावण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. तसेच नियमांचे त्याने उल्लंघन केल्यामुळे त्याला दोनवेळा दंडही झाला आहे. या बाबत पुन्हा सूचना देण्यात येतील.'' पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Metro work in progress without safety