
Pune : टिंबर मार्केटचे होणार स्थलांतर ?
पुणे - दाट लोकवस्ती वेढलेल्या टिंबर मार्केट येथे आगडोंब उसळल्याने तेथील भीषण स्थिती स्थानिकांसह महापालिका प्रशासनाने अनुभवली आहे. शहराचा वाढता विस्तार, अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी याचा विचार करता टिंबर मार्केट शहराच्या बाहेरच्या बाजूला हलविण्यासंदर्भात महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे. येथील व्यापाऱ्यांना जागा देण्यासाठी महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोकळ्या जागांची मागवली जाणार आहे.
टिंबर मार्केट येथे लाकडाच्या गोडावूनला लागलेल्या आगीत सुदैवाने यात जीवितहानी झालेली नसली तरी अनेक दुकाने, घरे, महापालिकेची शाळा यांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह इतरांनी घटनास्थळाची पाहणी केली. यापूर्वीही या परिसरात आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. वारंवार निर्माण होणाऱ्या स्थितीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ट
िंबर मार्केट मध्ये लोखंड, प्लायवूड, लाकूड याचे गोदाम आहेत. या भागात रोज शेकडो ट्रकची ये जा असल्याने दिवसभर या भागात वाहतूक कोंडी होते. या मार्केटच्या शेजारी दाट लोकवस्ती आहे, रस्ते रुंद असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे आणीबाणीच्या काळात अग्निशामक दलाचे बंब तेथे पोचण्यास अडचण येते.या पार्श्वभूमीवर महापालिकेने टिंबर मार्केटला स्थलांतरित करण्याची चाचपणी सुरू केली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘शहराचा विस्तार वाढत असताना ज्वलनशील वस्तू, होलसेल बाजारपेठ, मोठे गोडाऊन शहराच्या बाहेर स्थलांतरित केले पाहिजेत. अवजड ट्रकमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होत आहे, त्यातून सुटका होणे आवश्यक आहे.
शहराच्या बाजूने रिंगरोड होत असल्याने त्याच्या परिसरात नवे टिंबर मार्केट उभारता येऊ शकते. भविष्याचा विचार करून हा निर्णय घेणे आवश्यकच आहे. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शहराच्या लगत कोठे मोकळी जागा आहे याची माहिती मागवली जाणार आहे. त्यानंतर स्थानिक व्यापारी, नागरिकांशी चर्चा करून योग्य ती जागा निश्चीत केली जाईल.
गोडाऊन केले असल्याच तपासणी होणार
गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ यासह इतर ठिकाणी जुन्या वाड्यांमध्ये व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे गोडाऊन तयार करून घेतले आहेत. निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर होत असल्याबाबत सर्वेक्षण करून संबंधितांना बिगर निवासी दराने तीन पट कराची बिले पाठवली जातील, असे विक्रम कुमार यांनी सांगितले