
Milind Bodake : हाफ मॅरेथॉनची सेंच्युरी करणारा अवलिया!
पुणे - बदलत्या जीवनशैलीच्या स्वरूपामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची निगा राखणे ही काळाची गरज झाली आहे. उत्तम आरोग्यासाठी वयाचे बंधन नसून, फिटनेस हाच आपल्या जीवनाचा खरा मंत्र असायला हवा याची जाणीव करून दिली आहे हाफ मॅरेथॉनची सेंच्युरी करणाऱ्या अवलियाने. इतकंच नाही तर त्यांच्या या कामगिरीपासून प्रेरणा घेत अनेक जण त्यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेसला प्राधान्य देत आहेत.
येरवडा येथील एका टेलिकॉम कंपनीमध्ये काम करणाऱ्या ४७ वर्षांच्या मिलिंद बोडके यांनी नुकतेच १०० हाफ मॅरेथॉनचा टप्पा गाठला आहे. याबाबत ते म्हणाले, ‘‘कामानिमित्त नेहमी १२ ते १४ तास बाहेर राहावे लागत होते. तर महिन्यातील १४ ते १५ दिवस राज्यभर दौरा करावा लागत होता.
मात्र कोरोनाकाळात या सगळ्या गोष्टींवर निर्बंध आल्याने घराबाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे आरोग्याच्या समस्यादेखील जाणवू लागल्या. त्यामुळे घरातच २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन चार तासांत पूर्ण केली. त्यानंतर दर रविवारी १ हाफ मॅरेथॉन करण्याचा संकल्प केला. त्यानुसार आता १०० वी हाफ मॅरेथॉनही पूर्ण केली. या संकल्पनेंतर्गत राज्यातील दहा शहरांमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण केली आहे. आता पुढचे लक्ष्य २०० व्या हाफ मॅरेथॉनचा टप्पा गाठणे हे आहे. २३ मार्च २०२५ पर्यंत ते पूर्ण करण्याचा संकल्प आहे.’
हे झाले फायदे
वजन कमी करण्यास मदत झाली
अनेक वर्ष असलेल्या ॲलर्जीपासून सुटका
दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी, योग्य नियोजन करण्यास मदत
उपक्रमाबाबत...
मिलिंद यांनी आतापर्यंत पाच टाटा मुंबई फूल मॅरेथॉन, दोन टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, सहा सातारा हिल मॅरेथॉन सारख्या अनेक प्रतिष्ठित मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. तसेच दरवर्षी न चुकता ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीमार्गे विशाळगडावर गेले, त्या मार्गाने रात्रभर चालण्याची मोहीमसुद्धा ते राबवितात. विशेष म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला जितकी वर्षे झाली तेवढे किलोमीटर ते पळतात. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी ७५ किलोमीटर अंतर १४ तासांत धावून पूर्ण केले.