Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांकडून नाराजांची मनधरणी अन् सबुरीचा सल्लाही

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर तिकिट न मिळालेल्या नाराजांच्या नाकदुऱ्या काढत त्यांच्यावर प्रचाराची धुरा सोपविण्याची खेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर तिकिट न मिळालेल्या नाराजांच्या नाकदुऱ्या काढत त्यांच्यावर प्रचाराची धुरा सोपविण्याची खेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

पुण्यातील भाजपचे वर्चस्व कायम राखण्यासाठी आठही मतदारसंघातील नाराज इच्छुकांना वर्षावर बोलावून उमेदवारांचे मताधिक्‍य वाढविण्याचा सल्लावजा आदेश मुख्यमंत्री फडणवीस देत आहेत. कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळांपाठोपाठ मंगळवारी कसब्यातील इच्छुक धीरज घाटेंची मुख्यमंत्र्यांनी समजूत काढली.

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून लढविण्यासाठी भाजपमधील किमान शंभर जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. या पार्श्‍वभूमीवर तीन विद्यमान आमदारांची तिकिटे कापत पक्षाच्या आठ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. विशेषत: कोथरुडमधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कसब्यातून महापौर मुक्ता टिळक, शिवाजीनगरमधून सिध्दार्थ शिरोळेंना पक्षाने संधी दिल्याने या मतदारसंघातील अन्य इच्छुक नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमवर काही जणांची नावे पुढे येताच नाराजी मुंबई गाठून उमेदवारी मिळविण्याच्या हालचाली केल्या. त्यातही यश न आल्याने नाराजी मंडळी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष होते.

दरम्यान, नाराजांची मते जाणून घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. कोथरुडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, मोहोळांना योग्य वेळी पुर्नवसन करण्याचा शब्द त्यांनी दिला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा मिळत कसब्यातील उमेदवारीच्या शर्यतीत उतरलेल्या घाटेंशी चर्चा करीत, महापौर टिळकांच्या प्रचारात उतरण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानंतर घाटेंनी मुंबईतच टिळकांच्या विजयासाठी झटणार असल्याचे पत्र काढले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही नाराज मंडळी खरोखरीच कामाला लागणार की कामाला लावणार, असा प्रश्‍न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune MNP corporator dhiraj ghate meets cm devendra fadnavis