नवजात अर्भक मृत्यू रोखण्याचे ‘पुणे मॉडेल’

नवजात अर्भक मृत्यू रोखण्याचे ‘पुणे मॉडेल’

शहरातील सर्वांत मोठा आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज नवजात अर्भकांचा अतिदक्षता विभाग ससून रुग्णालयात सुरू होत आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’तून (पीपीपी) साकारलेला हा विभाग म्हणजे राज्यातील नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण (निओनेटल मॉरटॅलिटी रेट-एनएमआर) कमी करण्याचे ‘पुणे मॉडेल’ आहे, असा विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 

ससून रुग्णालयात ५९ खाटांचा नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) उभारण्यात आला आहे. अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेला हा विभाग रुग्णसेवेसाठी सज्ज झाला आहे. हा विभाग साकारण्यात वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि कार्पोरेट कंपन्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सढळ हाताने दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या देणगीतून शहरातील सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक ‘एनआयसीयू’ उभे राहिले आहे. त्यामुळे नवजात अर्भक मृत्यू रोखण्याचे ‘पुणे मॉडेल’ विकसित झाले आहे.

असे साकारले ‘एनआयसीयू’
ससून रुग्णालयात दर महिन्याला सुमारे ४३५ नवजात अर्भकांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते, अशी माहिती सलग सहा महिन्यांच्या विश्‍लेषणावरून पुढे आली. यातील प्रत्येक प्रसूती ही ससून रुग्णालयातच झालेली नसते. ‘एनआयसीयू’च्या खाटांची गरज आणि प्रत्यक्ष उपलब्धता यात तफावत होती. त्यामुळे ‘एनआयसीयू’ अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज करण्याचा निर्धार केला गेला. पण, एवढा मोठा खर्च सरकारी यंत्रणेतून उभा राहणार तरी कसा, या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टर्नशिप’चा मार्ग पुढे आला.

‘पुणे मॉडेल’चा आदर्श
फिनोलेक्‍स प्रायव्हेट लिमिटेड व त्याच्याशी संलग्न मुकुल माधव फाउंडेशन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, कमिन्स इंडिया, सुझलॉन एनर्जी, सिसका एल. ई. डी. आणि पर्सिस्टंट फाउंडेशन आदींनी दिलेल्या देणगीतून हा लहान मुलांचा अतिदक्षता विभाग साकारला आहे. अशा दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांमध्ये अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरविता येतील. त्यासाठी ससून रुग्णालयाचा आदर्श उपयुक्त ठरेल.

‘एनआयसीयू’लाच प्राधान्य का?
सार्वजनिक आरोग्याचा नवजात अर्भक मृत्यू हा अत्यंत संवेदनशील निकष आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. पृथ्वीवर आलेल्या नवजात अर्भकाचे पहिले एक हजार दिवस निर्णायक असतात. नवजात अर्भक दर म्हणजे यात जन्मल्यापासून ३० दिवसांमध्ये होणारे मृत्यू मोजले जातात. गर्भातील पोषणाचा हा स्पष्ट निर्देशांक आहे. देशात मृत्यू पावणाऱ्या बालकांपैकी ७० टक्के मृत्यू हे पहिल्या महिन्यात होतात. ही स्थिती इतकी भीषण असल्याने ‘एनआयसीयू’ विकसित करण्यास प्राधान्य दिले.

पुण्याची गरज
शहर आणि परिसरातील प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून ‘एनआयसीयू’च्या ६१ खाटा आहेत. खासगी रुग्णालयांमधील या खाटा धरल्या तरीही ही संख्या पाचशेच्या वर जात नाही. ‘स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट’ने दिलेल्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक तीन हजार प्रसूतींमागे १२ ‘एनआयसीयू’च्या खाटा आवश्‍यक आहेत. शहरातील ही गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून या ‘एनआयसीयू’चे महत्त्व आहे.

सामान्य रुग्णांच्या आवाक्‍याबाहेर गेलेली खासगी रुग्णालयासारखी अद्ययावत वैद्यकीय सेवा आता ससून रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय रुग्णांना हा मोठा आधार होईल, असा विश्‍वास वाटतो.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

‘एनआयसीयू’ तयार करणे हे मोठे आव्हान होते. प्रत्येक गोष्टींचा विचार करून येथे येणाऱ्या नवजात अर्भकाला याचा कसा फायदा होईल, हा उद्देश यात ठेवला होता. त्यातून नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागामुळे ‘एनएमआर’ कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. राजेश कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक,  बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

कोणत्याही ‘एनआयसीयू’तील उपचारांचा खर्च मध्यम वर्गीयांच्या आवाक्‍या बाहेर जातो. मात्र या ‘एनआयसीयू’च्या माध्यमातून मध्यम वर्गीयांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
- डॉ. उदय राजपूत, सहयोगी प्राध्यापक, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

जन्मलेल्या बाळासाठी आईचा सहवास महत्त्वाचा असतो. इतर ‘एनआयसीयू’मध्ये काही वेळासाठीच आईच्या जवळ बाळ दिले जाते. या विभागात मात्र बाळाच्या बरोबर आईचीही राहण्याची व्यवस्था केली, हे याचे विशेष वैशिष्ट्य आहे.
- डॉ. छाया वळवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com