डास नियंत्रणासाठी महापालिकेची समिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पुणे - राज्यातील सर्वाधिक डेंगीचे रुग्ण यंदा पुण्यात आढळले. डासांमुळे पसरणाऱ्या डेंगीच्या रुग्णांची संख्या शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात झपाट्याने वाढल्याचे निरीक्षण कीटकशास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. डास नियंत्रणासाठी आंतरविभागीय समिती स्थापन करण्याचा प्रयोग पुणे महापालिकेने केला आहे. त्या माध्यमातून ‘डास नियंत्रित पुणे’च्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. 

पुणे - राज्यातील सर्वाधिक डेंगीचे रुग्ण यंदा पुण्यात आढळले. डासांमुळे पसरणाऱ्या डेंगीच्या रुग्णांची संख्या शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात झपाट्याने वाढल्याचे निरीक्षण कीटकशास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. डास नियंत्रणासाठी आंतरविभागीय समिती स्थापन करण्याचा प्रयोग पुणे महापालिकेने केला आहे. त्या माध्यमातून ‘डास नियंत्रित पुणे’च्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. 

डेंगीच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण ठेवणे हे फक्त आरोग्य खात्याचे काम नसते. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व प्रमुख विभाग, स्वयंसेवी संस्था, उद्योग, रुग्णालये, डॉक्‍टर यांची सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे डास नियंत्रणात सक्रिय असणारी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. त्यात वेगवेगळ्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. याची पहिली बैठक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले, सहायक आरोग्य अधिकारी आणि कीटकरोग विभागप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्या उपस्थितीत झाली. 

याबाबत माहिती देताना डॉ. बळीवंत म्हणाल्या, ‘‘महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, खासगी, सहकारी संस्थांना या समितीच्या बैठकीत सहभागी करून घेण्यात आले होते. प्रशासनाशी समन्वय साधून डासनिर्मूलनाच्या कामात त्यांचे सहकार्य मिळावे, हा या बैठकीचा उद्देश होता. काम करत असलेल्या ठिकाणी, त्या परिसरात डासांच्या उत्पत्तीची स्थाने शोधून नष्ट करण्यासाठी या प्रतिनिधींची मदत घेण्यात येत आहे. त्यात उद्‌भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.’’

का वाढतोय डेंगी?
पुण्यात वाढते शहरीकरण आणि बदलत्या हवामानामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात जूनपासून डेंगीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर डासांची उत्पत्ती वाढली. फुटलेल्या काचा, नारळाच्या करवंट्या, टायर, प्लॅस्टिकचे तुटलेले डबे यात पावसाचे पाणी साचते. त्यात डासांची पैदास होते. यात ‘एडिस इजिप्ती’ या प्रकारच्या डासांच्या माध्यमातून डेंगीच्या विषाणूंचा माणसाला संसर्ग होतो. त्यातून डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढते, असेही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

४० सदस्य अनुपस्थित
महापालिकेने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या डास नियंत्रण समितीच्या बैठकीसाठी वेगवेगळ्या विभागांतील १२६ सदस्यांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ८६ सदस्य उपस्थित राहिले, तर ४० अनुपस्थित होते. 

समितीच्या सदस्यांची जबाबदारी
 कार्यक्षेत्रातील ताप आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणे
 त्या व्यक्तीला कीटकजन्य आजाराचा संसर्ग झाला असल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळविणे
 कीटकजन्य आजाराची माहिती, त्याबाबतची जागृती लोकांमध्ये करणे
 कार्यक्षेत्रात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेणे

Web Title: pune mosquito control municipal committee