पुणे-मुंबई अकरा मिनिटांत!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

‘हायपर लूप’ यंत्रणेचा वापर करण्याचा ‘पीएमआरडीए’चा विचार

पुणे - पुणे-मुंबई अवघ्या अकरा मिनिटांत.. हे अशक्‍य वाटते ना! परंतु आता ते शक्‍य होणार आहे. कारण, जगातील सर्वांत वेगवान वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाणारी ‘हायपर लूप’ ही वाहतूक यंत्रणा देशात प्रथमच पुणे ते मुंबईदरम्यान राबविण्याचा विचार पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुरू केला आहे. त्यासाठी जगविख्यात ‘हायपर लूप ट्रान्स्पोर्टेशन्स टेक्‍नॉलॉजी’ या कंपनीच्या तंत्रज्ञ पथकाने नुकतीच पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात भेट देऊन पाहणीही केली आहे.

दुबईमधील अबूधाबी, रशियातील मॉस्को आणि चीन या तीन देशांत सध्या प्रायोगिक तत्त्वावर या कंपनीकडून ही वाहतूक व्यवस्था उभारण्याचे काम सुरू आहे. भारतामध्ये ही वाहतूक व्यवस्था कुठे राबविता येईल का, यासंदर्भात कंपनीचे अध्यक्ष बीबॉप ग्रेस्टा यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. गडकरी यांनी पुणे-मुंबईदरम्यान ही योजना राबविणे शक्‍य असल्याचे मत व्यक्त 
केले होते.

तंत्रज्ञांच्या शिष्टमंडळाकडून पाहणी
काही दिवसांपूर्वीच संबंधित कंपनीचे प्रतिनिधी मुंबईत आले असता, पीएमआरडीएचे आयुक्त महेश झगडे आणि त्यांची भेट झाली. त्या भेटीत झालेल्या चर्चेनंतर गेल्या आठवड्यात या कंपनीच्या तंत्रज्ञांचे एक शिष्टमंडळ पुण्यात आले होते. त्यांनी पीएमआरडीएच्या परिसराची पाहणी केली. पुणे-मुंबईदरम्यान ही योजना हाती घेण्यात यावी, अशी सूचना पीएमआरडीएकडून या वेळी करण्यात आली. 

कमी खर्चात आणि परवडणारी यंत्रणा
या वाहतुकीसाठी पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वेच्या मधे असलेल्या जागेचा वापर होऊ शकतो. मेट्रो प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाच्या निम्म्या खर्चात आणि कमी वेळेत ही यंत्रणा उभे राहू शकते; तसेच तिकीट दरही सर्वसामान्य नागरिकांना परवडतील असे ठेवणे शक्‍य होऊ शकते. त्यामुळे या योजनेला प्राधान्य देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला असून, या संदर्भात अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: pune-mumbai in eleven minit