पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची सुरक्षा ‘रामभरोसे’

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची सुरक्षा ‘रामभरोसे’

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचा डांगोरा सरकारी यंत्रणांकडून पिटला जात असला तरी या रस्त्याची सुरक्षा रामभरोसे असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. 
मुंबईहून पुण्याकडे येताना अमृतांजन पुलाजवळ असणाऱ्या डोंगराचा कडा निसटण्याच्या बेतात असून तो पडल्यास द्रुतगती मार्गावर मोठी दुर्घटना घडू शकते. या कड्याला मध्यभागी तडा केला असून प्रशासनाला याची कल्पना आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

मुंबईहून पुण्याकडे येताना लागणाऱ्या लोणावळा बायपासजवळ दरड कोसळण्याची शक्‍यता आहे. याठिकाणी रस्ते विकास महामंडळाकडून सुरक्षित जाळ्या बसविल्या नाहीत. वाहनचालकांनी तिथून जाऊ नये म्हणून रस्त्यावर ‘स्टॉप’चे फलक लावल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले. 

बोरघाटातील बोगद्याच्या परिसरात बसविलेल्या सुरक्षा जाळ्यांमध्ये दरडीचे दगड सैल होऊन सुटून पडले आहेत; तर काही ठिकाणी डोंगरावरील कड्यांना तडे गेले आहेत. द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना वळण्यासाठी डिव्हायडर काढल्याचे काही ठिकाणी नजरेस पडते. 

खंडाळा परिसरात काही भागांमध्ये रस्त्यावरील काँक्रीट निघाले आहे. रस्ते विकास महामंडळाने रस्ता उखडलेल्या ठिकाणी डांबर टाकून ही ठिगळे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे हे डांबर निघाले असून, त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. 

खंडाळा परिसरातील रस्त्यावरील रबराच्या पट्ट्या निघाल्याने त्या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. वेगात असणाऱ्या वाहनांना त्यामुळे धोका होऊ शकतो. 

द्रुतगती मार्गावर कामशेत परिसरातील रस्त्याची परिस्थितीदेखील खराब आहे. अनेक भागांत काँक्रीटचा रस्ता उखडला आहे. मात्र, वाहनचालकांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणून रस्ते विकास महामंडळाने डांबर आणि खडी टाकून हा रस्ता बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेही उखडून बाहेर आले आहे. 

द्रुतगती मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी ब्रायफेन रोप बसविले आहेत. मात्र, मळवली ते उर्से मार्गावर अनेक ठिकाणी ते तुटल्याचे चित्र आहे. त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. द्रुतगती मार्गाच्या या परिस्थितीमुळे वाहनचालकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

प्रवासी म्हणतात...

जबाबदारी सरकारची
पावसाळ्यात द्रुतगती मार्गावर कायमच अडचणी येतात. प्रामुख्याने दरड कोसळणे, रस्ता उखडणे नित्याचेच झाले आहे. वाहनचालकांकडून रस्त्याच्या वापरासाठी टोल घेतला जात असेल तर हा रस्ता आणि त्याची सुरक्षा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची आहे.  
- सुरेश कोसंदर

सुरक्षेला प्राधान्य द्या
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे प्रत्येक वर्षी सेफ्टी ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना कोणताही त्रास होणार नाही, याकडे सरकारी यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे. रस्त्याची दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजना यांना सर्वप्रथम प्राधान्य द्यायला हवे. 
- संदीप राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com