#ExpressWay पुणे-मुंबई द्रुतगतीवर प्रतितास १५० किलोमीटरचा टप्पा पार

मंगेश कोळपकर
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

 प्रतितास ८० किलोमीटर  वेगमर्यादेची परवानगी असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून बहुसंख्य वाहने ताशी १०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावतात. आता तर ही वेगमर्यादा वाढविल्याने वाहनांनी किमान १५० किलोमीटर वेगाचा टप्पा गाठला असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

पुणे -  प्रतितास ८० किलोमीटर  वेगमर्यादेची परवानगी असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून बहुसंख्य वाहने ताशी १०० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावतात. आता तर ही वेगमर्यादा वाढविल्याने वाहनांनी किमान १५० किलोमीटर वेगाचा टप्पा गाठला असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारनेच प्रोत्साहन दिल्यामुळे द्रुतगतीवरील वाहतूक दिवसेंदिवस वेगवान अन्‌ असुरक्षित होत आहे. त्यामुळे ही वेगमर्यादा कमी होणार का? याकडे लक्ष लागले आहे. द्रुतगतीवर यापूर्वी ताशी ८० किलोमीटर वेगमर्यादा होती. परंतु, केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालयाने अध्यादेश काढून ती १२० किलोमीटर केली आहे. एक ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे द्रुतगतीवरील वाहतुकीची वेगमर्यादा वाढली आहे. परिणामी, बहुसंख्य वाहने अतिवेगाने धावतात. द्रुतगती मार्गाचे अभ्यासक तन्मय पेंडसे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत कॅमेऱ्यांद्वारे सुमारे २१ तास नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यात वाहनांचा वेग अधोरेखित झाला. त्यामुळे वेग कमी करण्याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी त्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) केली आहे. 

वेगमर्यादेत वाढ केल्यापासून वाहतुकीचा वेग वाढला आहे, ही बाब खरी आहे, तरीही वाहतुकीची सुरक्षितता जपण्यासाठी महामार्ग पोलिस विविध उपाययोजना करीत आहेत.
- विजय पाटील, अधीक्षक, महामार्ग पोलिस

शासकीय वेगमर्यादेचे लिमिट असेल, त्यापेक्षा ३०-४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगानेच वाहने जात असतात. ८० वरून वेगमर्यादा १२० केल्यावरही हेच दिसून येत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढवून असुरक्षितता वाढली असून, त्यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. 
- पुष्कर वांगीकर, नियमित प्रवासी

अपघातांची संख्या 
  २०१६ - २८१ 
  २०१७ - ३६०
  २०१८ - ३५८ 
  २०१९ (जूनपर्यंत) - १८६ 

द्रुतगती मार्ग कार्यान्वित - २००२ पासून
मार्गाची लांबी - ९४ किलोमीटर           बोगदे - ६           पादचारी पूल - ३५           रोजची वाहने - ४० हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Mumbai ExpressWay speed cross the 150 km per hour