मुंबई महामार्ग मृत्यूचा सापळा  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे-मुंबई मार्गावर वाकडेवाडी येथे कमलनयन बजाज उद्यान ते पाटील इस्टेट येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेसचा गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित बसथांबाच तयार झाला आहे. हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला आहे.

पुणे - पुणे-मुंबई मार्गावर वाकडेवाडी येथे कमलनयन बजाज उद्यान ते पाटील इस्टेट येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेसचा गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित बसथांबाच तयार झाला आहे. हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनत चालला आहे. याकडे खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पोलिसच या बसेसचा कोणालाही अडथळा होत नसल्याचा दावा करीत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून कमलनयन बजाज उद्यानासमोर रोज सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस मोठ्या प्रमाणात उभ्या राहतात. पाटील इस्टेटपासून शॉपर्स स्टॉपपर्यंत या बस व्यावसायिकांनी अनधिकृत प्रवासी थांबा तयार केला आहे. संपूर्ण सेवा रस्त्यावर बसची वाट पाहणारे प्रवासी उभे असतात. तसेच त्यांचे सामान सेवा रस्त्यावर ठेवलेले असते. परिणामी, सेवा रस्त्यावरील वाहने मुख्य रस्त्याने रात्रीच्या वेळी जाताना दिसतात. त्यामुळे समोरून जोरात येणारी व जाणारी वाहने यांच्यामध्ये समोरासमोर वाहने धडकून अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कमलनयन बजाज उद्यानासमोर तर साईराम ट्रॅव्हल्स या कंपनीच्या दहा ते वीस बस नेहमी उभ्या करण्यात येतात. तेथे कंपनीचा एक माणूस संध्याकाळी सातनंतर रात्री अकरा वाजेपर्यंत बसमध्ये प्रवासी बसवण्याचे काम करीत असतो. तसेच, याच ठिकाणी ट्रकमध्ये मावेल इतके सामान कार्टून बॉक्‍स आदी वस्तू चढउतार केले जातात. या सर्व गोष्टी सेवा रस्ता व मुख्य रस्त्यावर कसलीही परवानगी न घेता सर्रासपणे रोज सुरू असतात. येथून वाहतूक पोलिस अधिकारी सरकारी वाहनातून रोज ये-जा करतात, तरी त्यांना हा प्रकार कसा दिसत नाही, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल वाकडेवाडी येथील रहिवासी करीत आहेत.

पुणे-मुंबई रस्त्यावर, अत्यंत गर्दीच्या वेळी प्रवासी बसगाड्या बेकायदा थांबत असूनही वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहेत. इतकेच नव्हे तर, या बसगाड्यांचा वाहतुकीला अडथळा होत नाही आणि अडथळा होत असल्यास कारवाई करू, असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच वेळी खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभागाकडून सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी चारचाकी गाड्यांवर जॅमर कारवाई सुरू असते मात्र त्याच पोलिसांना या बेकायदा उभ्या असलेल्या बसगाड्या का दिसत नाही, असा सवाल वाहतूक पोलिसांना नागरिक करीत आहेत.

वाहतूक पोलिसांच्या वतीने सर्व ठिकाणी कारवाई करण्यात येते. बजाज उद्यान येथे लावण्यात येणाऱ्या खासगी बसचा वाहतुकीला अडथळा होत नाही. येथे एकही अपघात झालेला नाही, तरी कर्मचाऱ्यांना सांगून बेकायदा लावलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देऊन कारवाई सुरू करण्यात येईल.
- संगीता पाटील, पोलिस निरीक्षक, खडकी बोपोडी वाहतूक पोलिस विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Mumbai highway death trap