पुणे-मुंबई रेल्वे सेवा आठवडाभर बंद, कोल्हापूर मार्गही बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सततचा पाऊस आणि कर्जत-लोणावळा घाट भागात दरडीं कोसळण्याच्या घटना यामुळे पुणे ते मुंबई दरम्यानच्या इंटरसिटी गाड्यांसह अनेक रेल्वे गाड्या 9 ते 16 ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. तसेच पुणे स्थानकातून जाणाऱ्या काही गाड्याही रद्द केल्या असून कोल्हापूर शहरातील पूरामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. परिणामी, रेल्वे प्रवाशांना पुढील आढवडाभर रेल्वे प्रवास करता येणार नाही.

पुणे : सततचा पाऊस आणि कर्जत-लोणावळा घाट भागात दरडीं कोसळण्याच्या घटना यामुळे पुणे ते मुंबई दरम्यानच्या इंटरसिटी गाड्यांसह अनेक रेल्वे गाड्या 9 ते 16 ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत. तसेच पुणे स्थानकातून जाणाऱ्या काही गाड्याही रद्द केल्या असून कोल्हापूर शहरातील पूरामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. परिणामी, रेल्वे प्रवाशांना पुढील आढवडाभर रेल्वे प्रवास करता येणार नाही.

रेल्वे प्रशासनाने शुक्रवार (ता.9) ते पुढील शुक्रवार (ता.16) पर्यंत पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्‍स्प्रेस, प्रगती एक्‍स्प्रेस, सिंहगड एक्‍स्प्रेस, इंटरसिटी एक्‍स्प्रेस या इंटरसिटी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-गदग-मुंबई एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेस, पुणे-भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस या गाड्या देखील या काळात रद्द केल्या आहेत. तसेच हुबळी-मिरज-हुबळी एक्‍स्प्रेस (ता. 8 व 9 ), एलटीटी-काझीपेट-एलटीटी एक्‍स्प्रेस (ता.9 व 10), हापा-मडगाव-हापा एक्‍स्प्रेस (ता.8 व 9), कोल्हापूर-सोलापूर एक्‍स्प्रेस (ता. 8 व 10), कोल्हापूर-मनुगुरू-कोल्हापूर एक्‍स्प्रेस (ता. 9 व 10), मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर (ता.9), सोलापूर-मिरज एक्‍स्प्रेस (ता.9) या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यशवंतपूर- निजामुद्दीन एक्‍स्प्रेस दौंड-मनमाड मार्गे तर मैसूर-उदयपूर सिटी एक्‍स्प्रेस दौंड-पुणे मार्गे वळविण्यात आली आहे. तर पुणे स्थानकातून पनवेल-नांदेड एक्‍स्प्रेस (ता.10 व 12) आणि पनवेल-नांदेड विशेष गाडी (ता.11) सोडली जाणार आहे.

पुणे-दौंड डेमू गाडी
रेल्वेच्या पुणे विभागाने शनिवार (ता.10) ते सोमवार (ता.12) पुणे ते दौंड दरम्यान दोन डेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्याच्या दररोज चार फेऱ्या डेमू होणार असून त्या प्रत्येक स्थानकावर थांबणार आहेत. त्यामुळे पुणे ते दौंड दरम्यान आणि पुण्यावरून दौंडला जात तेथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Mumbai rail sevice Closed for week and Kolhapur road is also closed