प्रवाशांनो, पुणे-मुंबई प्रवास शक्यतो टाळाच; कारण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

बोरघाटात दरडींवरील उपाययोजना तसेच लोहमार्गाच्या दुरुस्तीसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट या काळात पुणे-मुंबई दरम्यान अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने पुढील आठ दिवस रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत.

लोणावळा : बोरघाटात दरडींवरील उपाययोजना तसेच लोहमार्गाच्या दुरुस्तीसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट या काळात पुणे-मुंबई दरम्यान अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने पुढील आठ दिवस रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने हा प्रवास धोकादायक झाला आहे. अशास्त्रीय पद्धतीने दरडी काढल्याने हा धोका वाढल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

बोरघाटात सुट्या दरडींवर उपाययोजनेबरोबर रेल्वेमार्गाची दुरुस्ती करण्यासाठी रेल्वेचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या 20 गाड्यांवर परिणाम होणार असून, गाड्या एकतर रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पुणे-मुंबई हा देशातील सर्वाधिक व्यग्र मार्ग मानला जातो. मुंबईत जाणारे चाकरमानी, विद्यार्थी तसेच व्यवसायासाठी दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुढील आठ दिवस रेल्वे वाहतूक विस्कळित होणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. 

दरडी काढण्याचे काम 'आउटसोर्स' 
ब्लॉकदरम्यान रेल्वेच्या वतीने रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह घाटमार्गात दरडी का कोसळतात, यामागील कारणांचा शोध घेण्यात येणार आहे. 2015 पासून दरडी कोसळण्याची मालिका कायम आहे. यामध्ये काही वेळा जीवितहानीही झाली आहे. रेल्वेने धोकादायक ठिकाणी मनुष्यबळ कायम तैनात केले असून, काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख सुरू आहे. खंडाळ्यात घाटमार्गात कोसळणारा मुसळधार पाऊस हे दरडींमागील प्रमुख कारण मानले जाते. पावसाळ्यात या डोंगरावरून दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात.

घाटमाथ्यावर होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी दरडींमध्ये मुरून झीज झाल्याने त्या ठिसूळ होऊन कोसळतात. सुट्या झालेल्या दरडी अशास्त्रीय पद्धतीने पाडण्यात आल्याने घाटमार्गात धोका अधिक वाढला आहे. पूर्वी रेल्वेचे कर्मचारी घाटमार्गात सतत कार्यरत असायचे. मात्र, सध्या दुरुस्तीची कामे खासगी कंत्राटदाराकडे "आउटसोर्स' करण्यात आली आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पुरेशा प्रशिक्षित व अकुशल कर्मचाऱ्यांमुळे काम लवकर उरकण्याचे बंधन, यामुळे कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune mumbai railway are block for fifteen day due to landslide repair