महापालिकेत 92 नवे चेहरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

बागूल सहाव्यांदा, कर्णे गुरुजी, कांबळे पाचव्यांदा सभागृहात

बागूल सहाव्यांदा, कर्णे गुरुजी, कांबळे पाचव्यांदा सभागृहात
पुणे - महापालिकेच्या नव्या सभागृहात 162 नगरसेवकांपैकी सर्वाधिक 56 टक्के, म्हणजे 92 नवे चेहरे आले आहेत. माजी उपमहापौर आबा बागूल सर्वाधिक सहाव्यांदा, त्यापाठोपाठ स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी आणि सुनील कांबळे पाचव्यांदा सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत. सलग पंधरा वर्षे सभागृहातील कामकाजाचा अनुभव असलेले अर्धा डझन नगरसेवक आता चौथ्यांदा सभागृहात राहतील.

महापालिकेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झालेले 19, तर दहा वर्षांचा अनुभव असलेले 42 नगरसेवक नव्या सभागृहात येणार आहेत.
महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे सुमारे 1102 उमेदवार रिंगणात होते. त्यांत, निवडून येण्याचा निकष लावताना सर्वच राजकीय पक्षांनी ज्येष्ठ, म्हणजे सभागृहातील अनुभवी नगरसेवकांसह नवे चेहरे निवडणूक रिंगणात उतरविले होते. विशेष म्हणजे, तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांना पक्षांनी प्राधान्य दिल्याचे त्या-त्या उमेदवारांच्या यादीवरून दिसून आले. त्यात, नवख्या महिला उमेदवारांचाही आकडा मोठा होता. या नव्या चेहऱ्यांनी निवडणुकीत बाजी मारल्याचेही निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडताना अनेक नवख्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी दिग्गज उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. तसेच, गेल्या एक-दोन निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागलेले काही उमेदवारही या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा सभागृहात येणार आहेत.

महापालिकेच्या 41 प्रभागांमधील 162 जागांकरिता झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 92 जण नवे असून, त्यापाठोपाठ दुसऱ्यांदा निवडून आलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. तर, बागूल 1992 पासून सलग तीस वर्षे सभागृहात असून, त्यानंतर कर्णे गुरुजी आणि कांबळे 25 वर्षे निवडून येत आहेत.

बागूल म्हणाले, ""महापालिकेच्या कामकाजासाठी अनुभवी सदस्य सभागृहात हवेत. पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेताना अनुभव उपयोगी पडतो. त्याच्या बळावर प्रशासकीय कामकाजावर अंकुश ठेवता येतो. त्याशिवाय, नव्या योजना, त्यांची अंमलबजावणी आणि खर्च यांची मांडणी योग्यरीत्या करण्याबाबत अशा सदस्यांचा महत्त्वाचा वाटा असेल. माझ्या अनुभवाचा पुणेकरांच्या हितासाठी उपयोग होईल.''

Web Title: pune municipal 92 new corporator