फुगवलेला अर्थसंकल्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

चालू आर्थिक वर्षी सुमारे १५०० कोटी रुपयांची तूट उत्पन्नात असतानाही त्याचा विचार न करता पुढील आर्थिक वर्षात (२०१९-२०) ३०० कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सादर केलेला प्रारूप अर्थसंकल्प हा वस्तुस्थितीदर्शक नसून चाळीस टक्‍क्‍यांनी फुगविल्याचे समोर आले आहे. 

महापालिका प्रशासनाकडून पुढील आर्थिक वर्षासाठीच्या (२०१९-२०) अर्थसंकल्पाचे प्रारूप गुरुवारी स्थायी समितीला सादर करण्यात आले. त्यामध्ये महापालिकेला ६ हजार ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात (२०१८-१९) महापालिकेला ५ हजार ८७० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते.

प्रत्यक्षात डिसेंबर अखेरपर्यंत ३ हजार ५४ कोटी रुपये उत्पन्न महापालिकेस मिळाले आहे. पुढील दोन महिन्यात उत्पन्न ४ हजार २०० ते ४ हजार ३०० कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चालू वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात पंधराशे कोटी रुपयांची तूट येणार हे स्पष्ट झाले आहे. चालू वर्षी अपेक्षित उत्पन्नापेक्षा महापालिकेला सुमारे दहा टक्के उत्पन्न कमी मिळणार आहे. असे असताना पुढील आर्थिक वर्षाच्या उत्पन्नात तीस टक्‍क्‍यांनी वाढ होईल, हे गृहीत धरून सहा हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे प्रारूप अर्थसंकल्प तब्बल १ एक हजार ८०० कोटी रुपयांनी म्हणजेच चाळीस टक्‍क्‍यांनी फुगविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्पन्न वाढीची ठोस उपाययोजना आणि खर्चात बचतीचे विशेष मार्ग न सुचवतादेखील उत्पन्नात एवढी मोठी वाढ कशाच्या आधारे गृहीत धरली आहे, असा प्रश्‍न या निमित्ताने उभा राहिला आहे.

Web Title: Pune Municipal Budget