
पुणे महापालिका आयुक्तांचा विद्युत विभागाला शॉक
पुणे : मुख्यखात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विद्युत विषयक कामांमध्ये अनागोंदी सुरू असल्याने या विभागाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शॉक दिला आहे. अंदाजपत्रकातील तरतुदींची फोड करून कमी रकमेच्या निविदा काढण्यास बंदी घातली आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी केवळ पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बघावे व मुख्य खात्याने नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी असे आदेश दिले आहेत.
पुणे महापालिकेकडून कोणताही नवीन प्रकल्प सुरू केला जात असताना त्यामध्ये विद्युत विभागाच्या कामाचा संबंध येतो. प्रत्येक वर्षी विद्युत विभागासाठी किमान ३०० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात असते. यामध्ये भांडवली व महसुली कामांचा समावेश असतो. महापालिकेतर्फे १० लाखा पर्यंतची कामे क्षेत्रीय कार्यालय, १० ते २५ लाखापर्यंतची कामे विभागीय उपायुक्त कार्यालय व २५ लाखाच्या पुढील कामे मुख्यखात्याकडून केली जातात. विद्युत विभागाकडून प्रामुख्याने मैलाशुद्धीकरण केंद्र, पथ दिवे, सर्व कार्यालये, उद्याने, नाट्यगृह आदी ठिकाणांवरील विद्युत व्यवस्थेची जबाबदारी असते. त्याच प्रमाणे महापालिकेतर्फे नव्याने उभारले जाणारे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, समाविष्ट ३४ गावांमध्येही विद्युत पुरवठा करावा लागतो. पण सध्या विद्युत विभागाच्या कामात अनागोंदी माजली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काय कामे केली जात आहेत, याची माहिती मुख्य विद्युत विभागाला नसते. त्यासाठी किती निधी खर्ची पडला याची कल्पना नसते. त्यावर गेल्या काही महिन्यात अनेक तक्रारी गेल्यानंतर आता आयुक्तांनीच विद्युत विभागात सुधारणा करण्यासाठी हस्तक्षेप केला आहे.
अशी होते अनियमितता
उदा. महापालिकेच्या अंदाजपत्रकात पथदिव्यांसाठी किंवा अन्य कामासाठी ३० लाख रुपयांची तरतूद असेल तर त्याचे १० लाखाचे तीन तुकडे करून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर मान्यता घेतली जाते. त्यामुळे संबंधित क्षेत्रीय अधिकारी व उपायुक्त यांच्या स्तरावरच अशा लहान रकमेच्या निविदा काढल्या जातात. केवळ वित्तीय मान्यतेसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल केले जातात. पण ही कामे कोठे करायची, कशी करायची याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी ठरवतात. अनेकदा मंजुरी एका ठिकाणची व काम दुसऱ्या ठिकाणी केले जाते. त्याची गुणवत्तातही राखली जात नाही.
अशी केली कामाची विभागणी
क्षेत्रीय कार्यालयांनी १० लाख रुपयांपर्यंतची पथ दिव्याची व महापालिकेच्या इमारतींच्या विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे क्षेत्रीय कार्यालये करतील. तर भूमिगत केबल, स्मशानभूमीचे काम, सीसीटीव्ही, रुग्णालये, लिफ्ट, सांस्कृतिक भवन, डेकोरेटिव्ह पथदिवे यांची कामे मुख्य विद्युत विभागाने करावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
‘‘विद्युत विभागातर्फे विविध विकास कामे व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. अंदाजपत्रकात मान्य केलेल्या तरतुदीचे विभाजन करून निविदा काढली जात आहे. हे नियमबाह्य असून, यापुढे तरतुदीचे विभाजन करू नये. मुख्यखात्याने करायची कामे व क्षेत्रीय कार्यालयाने करावयाची कामे कोणती हे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व अभियंत्यांनी काम करावे.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
Web Title: Pune Municipal Commissioner Vikram Kumar Order To Maintenance And Repair Of Street Lights Implementation Of New Projects
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..