पुणे महापालिकेच्या भरतीसाठी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

पुणे महापालिकेच्या भरतीसाठी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पूर्ण

पुणे - महापालिकेच्या पदभरतीचा दुसरा टप्पा आज (ता. ३) आज पार पडला. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षा सोमवारी झाली. राज्यातील पंधरा शहरात ७३ केंद्रावर १२ हजार ७०० उमेदवारांनी ही परीक्षा दिली, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे महापालिकेने पाच पदासाठी ४४८ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनतर्फे (आयबीपीएस) आॅनलाइन परिक्षा घेतली जात आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी १५ शहरात ७३ केंद्रांवर घेण्यात आली. १७ हजार २७३ उमेदवार ही परीक्षा देणे अपेक्षीत होते, पण १२ हजार ७०५ म्हणजे ७३ टक्के जणांनीच परीक्षा दिली.

ही परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी महापालिकेतर्फे १५२ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ही परीक्षा कोणताही गैरप्रकार झाला नाही, सर्व केंद्रांवर सुरळितपणे परीक्षा पार पडली, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले.

दरम्यान, आज (चार ऑक्टोबर) सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल. तर कारकून (क्लार्क) पदासाठीची (दोनशे पद) परीक्षा १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे.

परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्याने परीक्षांचा निकालही लवकर जाहीर होणार आहे. पहिल्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निकालाचे आरक्षणनिहाय वर्गीकरण करून कंपनीकडून हा निकाल पालिकेला पाठविण्यात येईल. त्यानंतर आयुक्तांची मान्यता घेऊन तातडीने निकाल प्रसिद्ध केला जाईल, असे इथापे यांनी सांगितले.