Pune News : पुणे शहरात ४१ मदत केंद्र अन पाणी काढण्यासाठी पथक pune municipal corporation 41 help centers and Water extraction team rain water | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune News : पुणे शहरात ४१ मदत केंद्र अन पाणी काढण्यासाठी पथक

पुणे - महापालिकेने शहरातील नाले, पावसाळी गटारांची सफाई केली असली तरीही पूर्वानुभव पाहता रस्त्यावर पाणी तुंबणे, वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे प्रकार दरवर्षी घडत आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होताच क्षेत्रीय कार्यालयांनी संबंधित भागात मनुष्यबळ व यंत्रणा कामाला लावून पाण्याचा निचरा करावा यासाठी पथक नियुक्त केले आहेत. तर रहिवासी भागात पाणी शिरल्यास तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ४७ मदत केंद्रांची व्यवस्था केली आहे.

पुणे महापालिकेतर्फे पावसाळा पूर्वी तयारी केली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालयाच्या उपायुक्तांसोबत बैठक घेण्यात आल्या आहेत. तर पोलिसांसोबतही समन्वयासाठी नुकतीच एक बैठक झाली आहे. पावसाळ्यात शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते या ठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी दरवर्षी उपाय योजना केल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो.

पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय निविदा काढल्या जातात. तर नाले सफाईसाठीही स्वतंत्र निविदा असतात. पावसाळी गटार आणि नाले सफाईसाठी महापालिका दरवर्षी किमान २० कोटी रुपये खर्च होतात. तरीही पावसाळ्यात शहराच्या अनेक भागात पाणी तुंबते, पावसाळी गटारातून पाणी वाहून जाण्याची क्षमता संपल्याचे अनुभव येत आहेत.

समन्वय नसल्याने टाळाटाळ

शहरात पाणी तुंबल्यानंतर तेथे काम कोणी करायचे यावरून मलःनिसारन विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समन्वय नव्हता. त्यामुळे कामे करण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र, आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या परिपत्रकात क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन उभारून अधिकारी, कर्मचारी आणि नोलड आॅफिसरची नियुक्ती करावी.

नाले, कलव्हर्टची साफ सफाई मुख्य खात्याकडून करण्यात आली असून, मुख्य खात्याच्या माध्यमातून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ओढवल्यास मदत कार्य करण्यासाठी पथक तयार ठेवावेत. अग्निशामक दलाने क्षेत्रीय कार्यालयांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १ जून ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी पूर नियंत्रण कक्ष स्थापन करून २४ बाय ७ दिवस तो सुरू ठेवावा असेही आदेशात नमूद केले आहे.

शहरात ४७ मदत केंद्र

रहिवासी भागात पुराचे पाणी शिरल्यास तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मदत केंद्र स्थापन केले आहेत. मुळामुठा नदी काठ, ज्या भागात नाल्यांचे पाणी शिरते अशा भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष दिले आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि मदत केंद्र निहाय यादी पुढील प्रमाणे नगर रस्ता- वडगाव शेरी - १ते २, येरवडा-कळस-धानोरी ३ ते ६, ढोले पाटील रस्ता ७ ते १०, औंध- बाणेर - ११ ते १४, कोथरूड-बावधन- १५ ते १९, शिवाजीनगर-घोले रस्ता -२० ते २८, सहकारनगर धनकवडी -२९, सिंहगड रस्ता - ३१ ते ३३, वारजे कर्वेनगर- ३४ते३५, हडपसर मुंढवा ३६, वानवडी रामटेकडी - ३७, कोंढवा येवलेवाडी ३८ ते ३९, कसबा विश्रामबाग -४० ते ४४, भवानी पेठ- ४५, बिबवेवाडी - ४६ ते ४७