भाजपच्या मतांत 40 टक्क्यांनी वाढ

Pune Municipal Corporation Election 2017
Pune Municipal Corporation Election 2017

पुणे महापालिकेतील कॉंग्रेसची बावीस वर्षांची राजवट 2007 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपुष्टात आणल्यानंतर पुणे पॅटर्नच्या नावाने स्थापन झालेल्या त्या पक्षाबरोबरच्या आघाडीत भारतीय जनता पक्ष सहभागी झाला होता. आता त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसला चितपट करीत भाजप पुण्यात सत्ताधारी झाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या महापालिका निवडणुकांतील या पक्षाची सोळा ते वीस टक्‍क्‍यांपर्यंतच सीमित असलेली मते या वेळी तब्बल 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. 

महापालिकेतील कॉंग्रेसची राजवट दोन दशके होती, त्यातील 1991 पासून खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखालील त्या पक्षाने तब्बल 2007 पर्यंत सत्ता उपभोगली. 2001 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 2002 च्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच भाग घेताना 22 जागा मिळविल्या. त्या वेळी 61 जागा पटकावत कॉंग्रेसच सत्तेवर आला. मात्र त्यानंतरच्या पाच वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले हातपाय पसरले आणि 2007 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला दणका दिला. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 41 पर्यंत मजल मारली, तर कॉंग्रेसला केवळ 36 जागा मिळाल्या. कलमाडी आणि कॉंग्रेस यांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रमुख उद्देशाने राष्ट्रवादीने 25 जागा मिळविलेल्या भाजपशी, तर 20 जागा मिळविलेल्या शिवसेनेशी पुणे पॅटर्न या नावाने आघाडी केली. 2012 मध्ये राष्ट्रवादीने आपली ताकद आणखी वाढवून 51 पर्यंत नेली, पण त्या वेळी पुणे पॅटर्न मोडीत काढून 28 जागा मिळविणाऱ्या कॉंग्रेसशी आघाडी केली. 

वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना मनसे एकूण जागा
1992 -- 52 24 5 -- 111
1997 -- 67 20 15 -- 124
2002 22 61 33 20 -- 146
2007 41 36 25 20 8 144
2012 51 28 26 15 28 152
2017 40 11 98 10 2 162

महापालिकेची 2012 मध्ये निवडणूक झाली आणि त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने राज्याप्रमाणेच पुण्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची धूळधाण केली. तीच मोदी लाट महापालिकेच्या निवडणुकीतही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली गावे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हुकमी जागा मिळण्याचा पट्टा होता. भाजपने त्या जागांवरही मुसंडी मारलीच; पण पूर्व भागातील कॉंग्रेसच्या भागातही तसेच कोथरूडच्या शिवसेनेच्या भागातही आपले चांगलेच अस्तित्व दाखवून दिले. 

भारतीय जनता पक्षाची पुणे महापालिकेतील वाटचालही पाहण्यासारखी आहे. 1992, 1997, 2002, 2007 आणि 2012 या निवडणुकांत या पक्षाला अनुक्रमे 24, 20, 33, 25 आणि 26 जागा मिळाल्या. प्रत्येक वेळेच्या बदलत्या जागा पाहता त्यांना एकूण जागांच्या 16 ते 21 टक्केच जागा मिळू शकल्या होत्या. या 2017 च्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली असून त्या पक्षाला एकूण जागांच्या तब्बल 60.49 टक्के म्हणजे 98 जागा मिळालेल्या आहेत.

पक्षसंघटनेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी आलेले यश, ऐनवेळी आयात केलेले उमेदवार, मतदारांचा भाजपकडे असलेला कल या बाबी त्याला कारणीभूत आहेत. भाजपच्या प्रचारासाठी पक्षाने वेंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर, मनोहर पर्रीकर असे तीन केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार विनय सहस्रबुद्धे, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्राचे सहप्रभारी राकेश सिंग, राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश, राज्याचे संघटनमंत्री रवींद्र भुसारी असा मोठा संघ उतरविला. पालकमंत्री गिरीश बापट, संजय काकडे यांनी स्थानिक बाजू सांभाळली. राष्ट्रवादीची भिस्त शरद पवार, अजित पवार यांच्यावरच प्रामुख्याने राहिली, तर कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, रझा मुराद, विरोधी पक्षनेते विधानसभा राधाकृष्ण पाटील यांना प्रचारात आणले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकच सभा पुण्यात घेतली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ताधारी असूनही भाजपच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील यशाचा धसका घेतल्याने त्या पक्षाने प्रचारात भाजप हाच प्रमुख मुद्दा केल्याने नकळत भाजपचाच प्रचार होत गेला. पराभूत मनोवृत्तीच्या अशा प्रचाराचा तोटाच राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रेसलाही झाला. कॉंग्रेसची घसरण तर फारच मोठ्या प्रमाणावर झाली. त्या पक्षाने 1992 ते 2012 पर्यंतच्या निवडणुकांपर्यंत 52, 67, 61, 36, 28 एवढ्या जागा मिळविल्या होत्या. या वर्षीच्या निवडणुकीत तर त्या पक्षाला केवळ 11 जागा मिळविता आल्या आहेत. मनसेने ही 2007 मध्ये 8 आणि 2012 मध्ये 28 जागा मिळविल्या होत्या. आता त्या पक्षाला केवळ 2 जागा मिळविता आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com