अभय योजना आता केवळ निवासी मिळकतींसाठीच राबविण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय | Abhay Yojana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Kumar
अभय योजना आता केवळ निवासी मिळकतींसाठीच राबविण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय

अभय योजना आता केवळ निवासी मिळकतींसाठीच राबविण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय

पुणे - शहरातील मिळकतींबाबत असलेली अभय योजना (Abhay Yojana) केवळ निवासी मिळकतींसाठीच राबविण्याचा निर्णय महापालिका (Municipal) आयुक्त विक्रमकुमार (Vikramkumar) यांनी घेतला आहे. त्यामुळे आता थकबाकीदार व्यापारी मिळकतींवर कारवाई केली जाणार आहे.

याबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बुधवारी (ता. ६) मिळकतकर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत अभय योजना फक्त रहिवासी मिळकतींसाठीच लागू करण्यावर शिक्कामोर्तब झाला. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे रहिवासी आणि व्यापारी अशा दोन्ही मिळकतींसाठी अभय योजना लागू करण्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या मनसुब्यांना पूर्णविराम मिळाला आहे. वारंवार अभय योजना राबविण्यात आल्याचा फटका प्रामाणिक करदात्यांना बसतो. तरीही ही योजना राबवायचीच असेल, तर ती केवळ रहिवासी थकबाकीदारांसाठीच असावी. व्यावसायिक थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविणे सध्याच्या परिस्थितीत योग्य होणार नसल्याचा सूर प्रशासनाने आळवला होता.

हेही वाचा: पुणे शहरात गुरुवारी एकाच दिवसात २ हजार २८४ नवे कोरोना रुग्ण

तीन आठवडे उलटूनही कार्यवाही नव्हती :

मिळकतकराची एक कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या थकबाकीदारांसाठीच अभय योजना राबविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. निर्धारित कालावधीत एकरकमी रक्कम भरणाऱ्या थकबाकीदारांना शास्तीच्या (दंड) रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात येणार होती. एक डिसेंबर २०२१ रोजी मूळ मिळकतकर आणि दोन टक्के शास्ती अशी एकूण थकबाकी एक कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या थकबाकीदारांनाच या योजनेचा फायदा घेता येणार होता. स्थायी समितीने मतदानाच्या जोरावर या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर सुमारे तीन आठवडे उलटूनही प्रशासनाने त्यावर कार्यवाही सुरू केली नव्हती.

अभय योजनेतून गेल्यावर्षी ४५० कोटी रुपयांची वसुली :

मिळकतकराच्या वसुलीसाठी सत्ताधारी भाजपने गेल्यावर्षी अभय योजना राबविली होती. ही अभय योजना ५० लाख रुपयांच्या आतील थकबाकीदारांसाठी होती. त्यापुढील थकबाकीदारांना या योजनेतून वगळावे अशी विरोधी पक्षांची उपसूचना मान्य करूनच एकमताने या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून सुमारे ४५० कोटी रुपयांची वसुली झाली होती. या योजनेमध्ये थकबाकीवर आकारलेल्या दंडाच्या रकमेवरील व्याजावर ७५ टक्के सूट देण्यात आली होती.

अभय योजनेअंतर्गत केवळ रहिवासी मिळकतकर थकबाकीदारांनाच सूट देण्यात येणार आहे. थकबाकीदार व्यापारी मिळकतींवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत अशा १६०० व्यापारी मिळकती सील करण्यात आल्या आहेत. तर या थकबाकीदारांकडून ३६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

- विक्रमकुमार, महापालिका आयुक्त

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top