
Illegal Hoarding : पुणे परिसरात होर्डिंग पुन्हा गेली ‘हवेत’! महापालिकेची कारवाई थंडावली
पुणे - महापालिका प्रशासनाकडून एकीकडे अनधिकृत होर्डिंग्जविरुद्धची कारवाई काही प्रमाणात थंडावल्याने अनधिकृत होर्डिंग्ज मालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तर दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर, समाविष्ट गावांमध्ये वाढदिवसांचे फ्लेक्स, बॅनर्स पुन्हा मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी दिसत असून महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची सद्यःस्थिती आहे.
काही महिन्यांपूर्वीच पुनावळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत होर्डिंगविरुद्ध कारवाईचा धडका लावला होता. आता मात्र अनधिकृत होर्डिंगविरुद्धची कारवाई पुन्हा एकदा थंडावल्याची चिन्हे आहेत.
नगर रस्त्यावरील रामवाडी ते वाघोली, विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, उंड्री चौक, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शत्रुंजय मंदिर ते गंगाधाम चौक, खडी मशिन चौक, सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक, आंबेगाव महामार्ग परिसर, हडपसर, शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ, रास्ता पेठ, मंगळवार पेठ, अशा विविध ठिकाणी अजूनही अनधिकृत होर्डिंग ठिकठिकाणी लागल्याची सद्यःस्थिती आहे. त्याचबरोबर अंतर्गत रस्ते, छोट्या-मोठ्या चौकांपासून ते प्रमुख रस्त्यांपर्यंत ठिकठिकाणी किरकोळ व्यवसाय, खासगी क्लास, प्रशिक्षण संस्था, विविध सेवा संस्थांचे फ्लेक्स, बॅनर्स झळकत आहेत.
काही ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागाकडून कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई तोंड बघून असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पावसाळा तोंडावर आलेला असताना अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्सबाबत अजून कडक कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
फ्लेक्सद्वारे विद्रूपीकरण
बहुतांश ठिकाणी स्थानिक माजी नगरसेवक, त्या-त्या भागातील स्वयंघोषित दादा, भाई, अण्णा यांच्या वाढदिवसांचे निमित्त पुढे करून कार्यकर्त्यांकडून स्वतःचे फोटो असणारे फ्लेक्स त्या-त्या परिसरात लावले जात आहेत, तर पदपथ, दुभाजकावरील विजेच्या खांबांनाही बॅनर्स लावले जात आहेत.
समाविष्ट गावांमध्ये प्रमाण अधिक
महापालिकेच्या हद्दीत येण्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये असताना जागामालकांची परवानगी घेऊन होर्डिंग्ज उभारले आहेत. संबंधित होर्डिंग्ज धोकादायक आहेत. याबरोबरच लग्न, वाढदिवस, मुंज व अन्य धार्मिक कार्यक्रमांचे फ्लेक्सही लावण्यात आले आहेत. महापालिका प्रशासन ते सातत्याने काढत असल्याचे चित्र काही ठिकाणी आहे; मात्र संबंधित मालक पुन्हा एकदा तेथे फ्लेक्सबाजी करीत असल्याची सद्यःस्थिती आहे.
पुण्यात मंगळवार पेठेत होर्डिंग कोसळून काही लोकांचा जीव गेला होता. पावसाळ्यापूर्वी अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स काढले नाहीत, तर पुन्हा एकदा अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किमान अशा कामांबाबत तरी महापालिकेने गांभीर्याने पाहिले पाहिजे. आजही रस्त्यावरून जाताना भीती वाटते.
- विजय कोळसे, नोकरदार
महापालिकेने आत्तापर्यंत १२००हून अधिक अनधिकृत होर्डिंग्ज काढले आहेत. उर्वरित अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे काम सुरू आहे.
- माधव जगताप, उपायुक्त अतिक्रमण व आकाशचिन्ह विभाग, पुणे महापालिका