
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रीतल मुसळधार पावसामुळे मुठा नदीत ३० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.
पुणे - खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रीतल मुसळधार पावसामुळे मुठा नदीत ३० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. पुलाची वाडी तसेच पाटील इस्टेट झोपडपट्टी येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी तयार केली आहे. तर दिवसभरात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ७१ नागरिकांनी संपर्क तक्रारी केल्या आहेत.
गुरुवारी मध्यरात्रीपासून पुणे शहर व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणी येण्याचे प्रमाण वेगाने वाढल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने ३० हजार क्युसेक्स करण्यात आला. यंदाच्या मोसमातील हा सर्वाधिक विसर्ग आहे. हे पाणी सोडल्यामुळे बाबा भिडे पूल व मुंढवा जॅकलेव येथील पूल पाण्याखाली गेला. अद्याप कोणत्याही वस्तीला धोका नसल्याने स्थलांतरित करण्याची गरज नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या ३९ शाळांमध्ये नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असला तरी, अद्याप पर्यंत कोणालाही स्थलांतरित करण्याची गरज भासली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे दिवसभरात ७१ कॉल आले आहेत. यामध्ये घरात, वस्तीत, साेसायटी पाणी शिरल्याच्या, खड्डे पडल्याच्या, झाड पडल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत. या ७१ काॅल्सनुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यावर कार्यवाही केली आहे.
‘मुठा नदीत ३५ हजार क्युसेक पाणी सोडल्यास पुलाच्या वाडीत पाणी शिरते, पण येथे सध्या धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुळा नदीत मुळशी व पवना धरणातून पाणी येत आहे. संगमवाडी येथे मुळामुठा नदीचा संगम होतो. त्यामुळे त्याचा फुगवटा निर्माण होऊन पाणी पाटील इस्टेट झोपडपट्टीत पाणी शिरण्याचा धोका असतो. पण सद्यःस्थितीत कोणताही धोका नाही, नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.’
- रवी खंदारे, सहाय्यक आयुक्त, शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय
पावसामुळे महापालिकेकडे आलेल्या तक्रारी
क्षेत्रीय कार्यालय व तक्रारी
सिंहगड रस्ता : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे
कोथरूड : मुंढे वस्ती येथे ओढ्याला पूर
कोंढवा येवलेवाडी : टायनी इंडस्ट्रीज येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले
औंध-बाणेर : वसंत विहार अपार्टमेंट येथे झाड पडले
येरवडा : अमृतेश्वर मंदिर येथे घरांमध्ये पाणी शिरले
कोथरूड : चांदणी चौक परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरले.