स्थायीसमोर वर्गीकरणाचे ठराव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

वर्गीकरणाचे ठराव मंजूर झाल्यास येत्या काळात वर्गीकरणाचे ठराव वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुणे - महापालिकेच्या अर्थसंकल्पातील कामे हाती घेतली जात नसतानाच, वेगवेगळ्या कामांसाठी वर्गीकरणाचे ठराव स्थायी समितीसमोर मांडण्यात आले आहेत. झाडणकाम आणि रस्त्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे ठराव आले आहेत. त्यात सत्ताधारी भाजपच्या सदस्यांचाही समावेश आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींना कात्री लावली जाणार नसल्याचे सांगत, वर्गीकरणाला मंजुरी देणार नसल्याचे स्थायी समितीने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, विविध स्वरूपाची कामे करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे ठराव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहेत. येत्या मंगळवारी समितीच्या बैठकीत त्यावर निर्णय होईल. 

महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करून (2017-18) दोन महिने झाले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सत्ताधारी भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. विकासाच्या कामांना प्राधान्य राहणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, अर्थसंकल्प मांडून काही दिवसही झाले नसतानाही, भाजपबरोबरच अन्य पक्षांच्या सदस्यांनी वर्गीकरणाचे ठराव मांडले होते. मात्र, ते मंजूर केले जाणार नसल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते. त्यामुळे वर्गीकरणाचे ठराव येणार नाहीत, अशी आशा होती. मात्र, झाडणकामासह रस्त्याच्या कामांकरिता, सुमारे दीड कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, असे ठराव आले आहेत. महापालिकेच्या खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठेतील (प्रभाग क्रमांक 18) रस्त्याच्या कामासाठी सुमारे 95 लाख रुपयांचा ठराव आहे, तर वानवडी प्रभागातील विविध विकासकामांसाठी 30 लाख रुपयांचा प्रस्ताव नगरसेवक धनराजा घोगरे यांनी ठेवला आहे. कसबा पेठ-रास्ता पेठेतील (प्रभाग 16) झाडणकामासाठी दहा लाख रुपयांचा ठराव आहे. 

वर्गीकरणाचे ठराव मंजूर झाल्यास येत्या काळात वर्गीकरणाचे ठराव वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: pune municipal corporation in pune