पुणे महापालिकेने घेतली जगातील सर्वांत महागडी गाडी (व्हिडिओ)

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 4 जुलै 2019

काय आहे ‘देवदूत’
- मूळ वाहन टेम्पो ट्रॅव्हलर
- जखमींना प्रथमोपचार आणि ऑक्‍सिजन मास्क
- पाचशे लिटर पाण्याची टाकी
- कटर (दरवाजा किंवा लोखंडी)  
- आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षित कर्मचारी
- चालकासह एका वाहनात चार कर्मचारी

पुणे -  जगातील महागड्या दराने धावणारी गाडी पुण्यात धावते. तिच्या धावण्याचा प्रत्येक किलोमीटरचा दर आहे, तब्बल पावणेसात हजार रुपये! वाचून धक्का बसला ना? पण हे अगदी खरे आहे. अर्थात, हा खर्च झेपण्याची ऐपत आहे, फक्त पुणे महापालिकेचीच. आपत्ती निवारणाच्या नावाखाली एवढी ‘महागडी सेवा’ देणाऱ्या ठेकेदाराच्या देवदूत गाडीसाठी महापालिकेने दीड वर्षात अकरा कोटी रुपये आनंदाने मोजले आहेत. मात्र, एवढा खर्च करूनही पुणेकरांच्या मदतीला ही गाडी किती धावली, याचे गूढ सर्वसामान्यांना अद्याप उलगडले नाही. 

पुण्यात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी धावणारी अद्ययावत कॉर्डिओ ऍम्बुलन्स ही किलोमीटरमागे आठशे ते हजार रुपये दर आकारते. मात्र, त्याच्या सातपट दर महापालिका देवदूत गाडीसाठी देत आहे. ‘कॉर्डिओ ऍम्बुलन्स’मध्ये अद्ययावत जीवरक्षक प्रणाली असते, त्या तुलनेत ‘देवदूत’मध्ये प्रथमोपचार पेटी आणि ऑक्‍सिजन मास्कची सुविधा असते.

देवदूत हे वाहन रोज सरासरी पाच किलोमीटर धावत आहे, त्यासाठी महिन्याकाठी सरसकट दहा लाख रुपये देण्याचा प्रताप महापालिका करीत आहे. त्यानुसार महापालिकेने ठेकेदाराच्या नावाने गेल्या दीड वर्षात १० कोटी ८० लाख रुपयांची बिले काढली आहेत.  एवढा पैसा घेतलेल्या ‘देवदूत’च्या कामाचा तपशील मात्र कुठेच सापडत नाही.  

पुण्यातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेची व्याप्ती वाढविण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०१७ पासून ‘देवदूत’ ही यंत्रणा उभारली. त्यासाठी ठेकेदारांकडून ७० प्रशिक्षित कर्मचारी आणि सहा वाहने करार पद्धतीने घेतली. परंतु, नोंदवहीतील ७० पैकी केवळ २८ कर्मचारीच महापालिकेकडे असल्याचे अग्निशामक दलाकडून मंगळवारी सांगण्यात आले. या टीमवर अग्निशामक दलाचे नियंत्रण आहे. तेव्हा, कोंढवा आणि आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेसह अन्य ठिकाणी आपत्तीच्या काळात ही टीम गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर ही यंत्रणा नेमकी काय आहे, त्यातील कर्मचारी, वाहने यांचा शोध घेतला असता, एक ‘देवदूत’ वाहन आणि दोन कर्मचारी भवानी पेठेतील अग्निशामक दलाच्या मुख्य केंद्रात भेटले. ही वाहने रोज किती किलोमीटर धावतात, याच्या नोंदी पाहिल्या, तर त्यातही अनेक गडबडी दिसून आल्या. अग्निशामक दलातील वाहनांसोबतच ‘देवदूत’च्या कर्मचाऱ्यांना पाठविले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तेव्हा ‘देवदूत’ जागेवरच असते. त्यामुळे या वाहनांच्या देखभाल- दुरुस्तीसह काही वेळा आपत्तीच्या ठिकाणी जाऊनही एक वाहन सरासरी रोज पाच ते सहा किलोमीटर धावत असल्याचा हिशेब लागला आहे. तो महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ‘देवदूत’च्या कर्मचाऱ्यांनीही मान्य केला. 

काय आहे ‘देवदूत’
- मूळ वाहन टेम्पो ट्रॅव्हलर
- जखमींना प्रथमोपचार आणि ऑक्‍सिजन मास्क
- पाचशे लिटर पाण्याची टाकी
- कटर (दरवाजा किंवा लोखंडी)  
- आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षित कर्मचारी
- चालकासह एका वाहनात चार कर्मचारी

‘देवदूत’ वाहनांचा तपशील 
एकूण वाहने - ६ 
वाहन खर्च  : १० लाख रुपये (महिन्याकाठी - प्रत्येकी) 
प्रवास : १५० किलोमीटर (महिन्याकाठी - प्रत्येकी)
कर्मचारी : चालकासह चार
वेतन : १० हजार रुपये (महिन्याकाठी, प्रति कर्मचारी)     

वाहने आणि कर्मचाऱ्यांवरील दीड वर्षातील खर्च 
१० कोटी ७२ लाख

आपत्ती निवारणासाठी घेतलेल्या ‘देवदूत’ 
टीमसाठी महिन्याला प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येतात. त्यांच्याकडून अपेक्षित काम करून घेण्याची जबाबदारी अग्निशामक दलाची आहे. त्या रोज किती किलोमीटर धावतात, कुठे जातात, याची माहिती 
दलाकडेच आहे.
- सुनील गायकवाड,  उपायुक्त, महापालिका (तांत्रिक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Corporation purchase world most expensive car