पुणे महापालिकेने पाण्याचे ऑडिट करावे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

पुणे : पाण्याची गळती आणि चोरी शोधण्यासाठी महापालिकेने पाण्याचे 'ऑडिट' करावे. तत्पूर्वी पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असा सल्ला देत अधिकाधिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी केले.

महापालिका आणि पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात एकत्रित बैठक घेऊ, असेही महाजन यांनी सांगितले. 

पुणे : पाण्याची गळती आणि चोरी शोधण्यासाठी महापालिकेने पाण्याचे 'ऑडिट' करावे. तत्पूर्वी पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असा सल्ला देत अधिकाधिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी केले.

महापालिका आणि पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात एकत्रित बैठक घेऊ, असेही महाजन यांनी सांगितले. 

महापालिकेच्या वतीने पर्वती जलकेंद्रात उभारण्यात आलेल्या पाचशे दशलक्ष (एमएलडी) लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, महापालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. 

महाजन म्हणाले, ''खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रापर्यंत कालव्यातून पाणी घेतले जाते. ते आता बंद वाहिनीतून घेण्यासाठी पावले उचलता येतील. पाण्याची गळती आणि चोरी होते का? याचा शोध घेतला पाहिजे. नेमकी कुठे आणि कशामुळे गळती होते याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याची स्थिती लक्षात घेऊन त्याची बचतीसाठी प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत. शहरात निर्माण होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. ते थेट नदीत सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्रक्रियेचे प्रमाण वाढवून त्याचा पुनर्वापर झाला पाहिजे. त्यातून शेतीसाठी पाणी देता येईल का, याचाही विचार केला पाहिजे.'' 

पुणे शहरात पाटबंधारे खात्याच्या जागा आहेत. मात्र, त्या कुठे आहेत, त्यावर किती अतिक्रमणे आहेत, हे पाहायला हवे. त्यासाठी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. 

टिळक नाशिकच्या महापौर 
भाषणाच्या सुरवातीला महाजन यांनी नाशिकच्या महापौर मुक्ता टिळक आणि नागपूरचे आयुक्त सौरभ राव असा उल्लेख केला. मात्र, ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. आपले भाषण त्यांनी सुरूच ठेवले. तेव्हा व्यासपीठासह उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर महाजनांनी लगेचच खुलासाही केला. 'मी नाशिकचा पालकमंत्री असल्याने असा उल्लेख झाला आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात ना?' असे सांगून त्यांनी सारवासारव केली.

Web Title: Pune Municipal Corporation should audit water usage