
Pune : उपनगर आणि समाविष्ट गावातील रस्त्यांचा मुहूर्त कधी
उंड्री : शहरातील 50 रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निकष लावले ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, उपनगर आणि समाविष्ट गावातील रस्त्यांच्या कामासाठी कधी मुहूर्त लागणार असा सवाल शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.
उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी परिसरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याचे परतीच्या पावसाने दुर्दशा झाली आहे. पालिका प्रशासनाने ठिगळे लावून रस्ते असमतोल बनविण्याऐवजी समतल रस्ता बनवून वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळ थांबवावा. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर किमान मुलभूत समस्या सुटतील अशी अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत रस्ते, पाणी, कचरा समस्या जैसे थे असल्याने आमची ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ आल्याचे दिलीप गायकवाड, मारुती दगडे, बबन मोहिते, उत्तम फुलावरे, दत्तात्रय होले, सुरेश होळकर, नाना बांदल यांनी सांगितले.
दिवाळीच्या सुटीनंतर शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. आम्ही सायकलवर शाळेत जातो. मात्र, अरुंद रस्ते, खड्डे आणि वाहनांच्या गर्दीमुळे सायकल घरी ठेवून पायी जायचे का, प्रदूषण टाळण्यासाठी सायकल वापरा असा एका बाजूला प्रशासन नारा देत आहे, दुसरीकडे सायकल चालविण्यासाठी रस्ता मिळत नाही, असा विरोधाभास आहे.
-रणवीर भिंताडे, उंड्री
महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यापासून पाणी मिळत नाही, स्वच्छता होत नाही, पालिका प्रशासन लक्ष देत नाही. समाविष्ट गावाच्या सुविधेसाठी कोणी वालीच उरला नाही.
-दादा औताडे, औताडेवाडी
दरम्यान, पालिकेचे कार्यकारी अभियंता संदीप रणवरे म्हणाले की, बजेट उपलब्ध झाल्यानंतर रस्त्याची कामे केली जाणार आहेत.