ऐन उन्हाळ्यात पुणे महापालिकेचे जलतरण तलाव कोरडेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swimming Tank

पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जलतरण तलाव बांधले. पण त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे परवडत नाही. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून शहरातील आठ जलतरण तलाव बंद आहेत.

Swimming Tank : ऐन उन्हाळ्यात पुणे महापालिकेचे जलतरण तलाव कोरडेच

पुणे - महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जलतरण तलाव बांधले. पण त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे परवडत नाही. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून शहरातील आठ जलतरण तलाव बंद आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हे तलाव पाण्याअभावी कोरडेठाक पडले आहेत. तेथे फरशा तुटणे, तलावात झाड उगवणे, इमारतीची दुरवस्था होणे अशी वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे हे जलतरण तलाव प्रशासकीय अनास्थेमुळे पांढरा हत्ती ठरत आहेत.

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. त्यामध्ये बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, नाट्यगृह, व्यायामशाळा, समाजमंदिर, विरंगुळा केंद्र, स्केटिंग रिंग आदींचा समावेश आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये जलतरण तलावांची मागणी वाढली. ज्या ठिकाणी नागरी सुविधांसाठी मोकळ्या जागा आहेत, तेथे जलतरण तलाव बांधण्यास महापालिकेने सुरवात केली. एक जलतरण तलाव बांधण्यासाठी किमान दीड ते दोन कोटी रुपये खर्च येतो. एवढी तरतूद एकाच अर्थसंकल्पात उपलब्ध होत नसल्याने हे काम दोन किंवा तीन वर्षात पूर्ण केले जाते.

आठ जलतरण तलाव बंद

गेल्यावर्षी एप्रिल २०२२ मध्ये ३४ पैकी १८ जलतरण तलाव सुरू होते. तर १६ बंद पडले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर सुमारे ७० लाख रुपये खर्च करून यापैकी आठ जलतरण तलाव सुरू करण्यात महापालिकेला यश आले. पण, अद्यापही आठ जलतरण तलाव बंद पडलेले आहेत. त्यांची अवस्था सुधारण्यासाठी किमान तीन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याची तरतूद २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात झाली तर जलतरण तलावांची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेने शहरात ३४ जलतरण तलाव बांधले आहेत. हे जलतरण तलाव चालविण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नसल्याने त्याची निविदा काढून ते खासगी संस्थेला तीन वर्षांसाठी चालविण्यासाठी दिले जातात. पण, या जलतरण तलावातील टाइल्स निघणे, लिकेज होणे, पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा खराब होणे आदी कारणांमुळे जलतरण तलाव बंद पडतात. शहरातील अनेक जलतरण तलाव कोरोनाच्या पूर्वीपासून बंद आहेत. त्यामुळे जलतरण तलावात पिंपळ, वड, बाभूळ अशी झाडे उगवली आहेत. ते काढण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सुरक्षा व्यवस्था नसल्याने नळ, दिवे, पत्र्याचे शेड, लोखंडी बार यांसह इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. तळीरामांना दारू पिण्यासाठी हक्काची जागा मिळत आहे.

बंद पडलेले जलतरण तलाव

 • कै. केशवराव ढेरे जलतरण तलाव, येरवडा

 • कै. विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुल, हडपसर

 • औंध सर्वे क्रमांक १५२

 • डॉ. अब्दुल कलाम जलतरण तलाव, पाषाण

 • कै. पांडुरंग तुकाराम कवडे जलतरण तलाव, घोरपडी गाव

 • सर्वे क्रमांक ४/११ खराडी

 • सर्वे क्रमांक ६६/५/१ कोंढवा

 • स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव, वडगाव बुद्रूक

स्थापत्य विषयक कामांमुळे महापालिकेचे आठ जलतरण तलाव बंद आहेत. तेथे दुरुस्तीचे कामे करून पुढील वर्षात हे जलतरण तलाव सुरू होतील. सध्या २६ जलतरण तलाव सुरू असून, त्यामधून महापालिकेला एका वर्षाला एक कोटी नऊ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. एक कोटी २० लाखांची जुन्या ठेकेदारांची थकबाकी असून, ती त्यांनी न भरल्यास त्यांच्या मिळकतीवर बोजा चढविणार आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातून या संस्थांची माहिती मागवली आहे.

- संतोष वारुळे, उपायुक्त, क्रीडा विभाग

घोरपडी गावातील जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. आतापर्यंत अनेकदा लाखो रुपये खर्च केला, पण कामाचा दर्जा चांगला नसल्याने फरशा निघाल्या आहेत. स्वच्छतागृह, चेंजिंग रुममधील साहित्य चोरीला गेले आहेत. जागोजागी कचरा आणि दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. याठिकाणी चांगल्या पद्धतीने दुरुस्तीचे काम करून हा जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करणे आवश्‍यक आहे.

- अतुल कवडे, घोरपडी गाव

गेल्या पाच वर्षांपासून औंध येथील जलतरण तलाव बंद आहे. नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे आतातरी हा तलाव सुरू करावा.

- रणजित कलापुरे, स्थानिक रहिवासी, औंध

पालिकेने ठरवलेले दर

 • २० रुपये - दैनंदिन शुल्क

 • ३५० रुपये - मासिक शुल्क

 • २५० रुपये - विद्यार्थी पास

 • ३२०० रुपये - वार्षिक विद्यार्थी पास

 • २००० रुपये - सार्वजनिक संस्था, शाळा, महाविद्यालयांसाठी

 • ५० रुपये - सभासद प्रवेश शुल्क

 • मोफत - महापालिका सभासद