महापालिका करणार डेंगीमुक्त पुणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

पुणे - शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन डेंगीच्या डासांचा नायनाट करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रथमच महापालिकेने हाती घेतला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापासून डेंगीमुक्त पुण्यासाठी हा प्रकल्प सुरू होणार असून, त्या अंतर्गत शाळा, रुग्णालये, बांधकामाच्या जागा, सरकारी कार्यालयांमधील डास उत्पत्ती जागा रोज शोधून त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. 

 

पुणे - शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन डेंगीच्या डासांचा नायनाट करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रथमच महापालिकेने हाती घेतला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापासून डेंगीमुक्त पुण्यासाठी हा प्रकल्प सुरू होणार असून, त्या अंतर्गत शाळा, रुग्णालये, बांधकामाच्या जागा, सरकारी कार्यालयांमधील डास उत्पत्ती जागा रोज शोधून त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. 

 

शहर आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यातून डेंगीचा उद्रेक होतो. हा उद्रेक रोखण्यासाठी आत्ता ठोस पावले न उचलल्यास येत्या दोन महिन्यांमध्ये शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी यंदा प्रथमच अशा प्रकारे घराघरात जाऊन डासोत्पत्तीची ठिकाणे शोधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे, अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी "सकाळ‘ला दिली. 

पल्स पोलिओच्या धर्तीवर घराघरात जाऊन डासनिर्मूलन करण्याचा कार्यक्रम आखला आहे. सोमवारपासून (ता. 15) याची सुरवात होणार असून, शहरातील सर्व मिळकतींची या अंतर्गत पाहणी करण्यात येत आहे. त्यातून डासोत्पत्ती नियंत्रणात येऊन शहरातील संभाव्य डेंगीच्या उद्रेकाचा धोका कमी होईल, अशा प्रकारचा हा शहरातील पहिला प्रयोग आहे. 

- डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका 

असा राबविणार प्रकल्प 

महापालिकेच्या 16 क्षेत्रीय कार्यालयांतील कीटक प्रतिबंध विभागात 20 कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्राचे पाच विभागांत विभाजन करून चार जणांचे एक पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक रोज तीनशे घरांची पाहणी करेल. हे पथक घरातील डास उत्पत्ती नष्ट करणार असून, तेथे औषध फवारणी करेल. रोजच्या रोज घरभेटींचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. घर पाहणीला विरोध करणाऱ्यांचीही नोंद यात करण्यात येईल. 

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये 

- महापालिकेच्या पथकाने भेट दिल्याची नोंद खडूने करण्यात येईल. 

- या पथकाने केलेल्या कामाची स्वतंत्र यंत्रणेतर्फे पुन्हा खात्री केली जाईल. 

- घर बंद असल्यास दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट देण्यात येईल. 

- दुपारी 1 ते 4 या वेळेत कोणत्याही घरात भेट दिली जाणार नाही. 

- एका घरात भेटीसाठी पाच ते सात मिनिटे लागतील. 

- प्रशिक्षित कर्मचाऱ्यांतर्फे पाहणी होणार 

- जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप 

दंडाची तरतूद 

डेंगीच्या डासांची अंडी सापडलेल्या मिळकतींना दंड ठोठावण्यात येणार आहे. या दंडाची रक्कम पाचशे रुपयांपासून सुरू होईल. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याने हा दंड करण्यात येत असल्याचेही आरोग्य खात्यातील डॉ. देवकर यांनी स्पष्ट करण्यात आले. 

महापालिकेच्या आवारातही डेंगीच्या आळ्या 

महापालिकेच्या आवारात नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहेत. तेथेही डेंगीच्या आळ्या सापडल्याने तेथील ठेकेदाराला सात हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे, तसेच इतर बांधकामाच्या ठिकाणांनाही नोटीस देऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. 

जुलैमध्ये 71 हजारांचा दंड वसूल 

महापालिकेच्या सोळा क्षेत्रीय कार्यालयांमधून जुलैमध्ये 71 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला, तर 738 मिळकतींना नोटीस बजावण्यात आल्या. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील मिळकतींना सर्वाधिक म्हणजे 46 हजार 400 रुपयांचा दंड केला आहे. 

असा होतो डेंगीचा फैलाव 

एडिस इजिप्ती या डासापासून डेंगीचा फैलाव होतो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात हे डास अंडी घालतात. त्यातून त्यांची पैदास पावसाळ्यात वाढते. नारळाच्या करवंट्या, टायर, फुटलेल्या बाटल्या, बाटल्यांच्या झाकणात साचलेल्या पावसाच्या पाण्यात हे डास आढळतात. यंदा राज्यातील बहुतांश भागात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. 

पुण्यातील डेंगी 

महिने ........ रुग्ण संख्या 

ऑगस्ट ....... 153 

जुलै ........... 295 

जून ........... 140 

मे ............ 30 

एप्रिल .......... 18

Web Title: Pune Municipal Corporation will Dengue free