पुणे महापालिका मिळकत कर बिलांचे वाटप 1 मेपासून करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे महापालिकेने 2023-24 या आर्थिक वर्षातील मिळकत करांच्या बिलांचे वाटप 1 मे पासून करण्याचा निर्णय घेतला आहे.

Property Tax : पुणे महापालिका मिळकत कर बिलांचे वाटप 1 मेपासून करणार

पुणे - निवासी मिळकतींसाठी दिली जाणारी 40 टक्के सवलत कायम ठेवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, मात्र राज्य मंत्रीमंडळामध्ये अद्यापही त्याबाबत निर्णय न झाल्याने अखेर पुणे महापालिकेने 2023-24 या वर्षातील मिळकत कराच्या बिलांचे वाटप मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर घेण्याचे निश्‍चित केले आहे. मिळकत कराच्या बिलांचे वाटप 1 मे पासून केले जाणार आहे, तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार 40 टक्के सवलत काढल्यानंतर आकारलेल्या मिळकतींची बिले भरण्यासही 30 एप्रिलपर्यत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात थकबाकीदारांकडून दंडाची आकारणी केली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

महापालिकेकडून नागरीकांना नव्या आर्थिक वर्षात मिळकत कराच्या बिलांचे वाटप केले जाते. महापालिकेकडून नागरीकांना त्यांच्या निवासी मिळकतीवर मिळकतकराच्या 40 टक्के सवलत दिली जात होती. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची नोंद महालेखा परीक्षकांच्या (कॅग) नोंदविल्यानंतर हि सवलत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतला. त्यामुळे 1 लाख 65 हजार मिळकतधारकांकडून 100 टक्के दराने कर आकारणी केली जात होती. हि सवलत रद्द झाल्याने नागरीकांनी त्यास मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला. त्याची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दखल घेत राज्य सरकारपुढे सवलत पुर्ववत ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सप्टेंबर महिन्यात नागरीकांनी हि बिले भरु नयेत, असे आवाहन केले होते.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये 40 टक्के कर सवलत पुर्ववत करण्याचे निश्‍चित झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याची घोषणाही केली. मात्र त्यानंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन राज्य सरकाकडून त्याविषयी आदेश निघणे अपेक्षित होते.

मात्र अजूनही राज्य सरकारने त्याबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने नागरीकांमध्ये संभ्रम होता. त्यातच नव्या आर्थिक वर्षानुसार महापालिकेकडून 1 एप्रिलपासूनच नागरीकांना मिळकत कराची बिले पाठविण्यास सुरुवात होते. मात्र 40 टक्के कर सवलतीबाबतचा निर्णय न झाल्याने महापालिका प्रशासनाचीही अडचण झाली होती. याबाबतचा निर्णय आगामी काही दिवसात होईल, अशी शक्‍यता लक्षात घेऊन महापालिकेने 2023-24 या वर्षाच्या मिळकत कराच्या बिलांचे वाटप 1 मेपासून करण्याचा निर्णय घेतला आहे.

'राज्य सरकारने 40 टक्के मिळकत कर सवलतीबाबत निर्णय घेतल्यानंतर नागरीकांना दुरूस्तीसह बिले द्यावी लागतील, अन्यथा गोंधळ निर्माण होईल. राज्य सरकार 40 टक्के कर सवलत नेमकी केव्हापासून करणार यावरही नवीन बिलांची छपाई अवलंबून आहे. त्यामुळे सध्या तरी पुढील वर्षाच्या बिलांचे वाटप 1 मे पासून होईल. तसेच महापालिका 31 मे पर्यंत मिळकत कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करामध्ये 5 टक्के सवलत देते. त्याचीही मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. 40 टक्के सवलत काढल्यामुळे ज्या मिळकत धारकांना अधिकची बिले आली आहेत व ज्यांनी ती भरलेली नाहीत, त्यानांही ही बिले भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.'

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.