Pune News : मैलाशुद्धिकरण प्रकल्पाच्या कामात होणार १०० कोटीची बचत

केंद्र सरकारने मैलाशुद्धीकरण प्रकल्पातील सीओडी आणि बिओडीचे निकष बदलल्याने सहा मैलाशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) अद्ययावत केले जाणार
Sewage Treatment Plant
Sewage Treatment Plantsakal
Summary

केंद्र सरकारने मैलाशुद्धीकरण प्रकल्पातील सीओडी आणि बिओडीचे निकष बदलल्याने सहा मैलाशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) अद्ययावत केले जाणार

पुणे - केंद्र सरकारने मैलाशुद्धीकरण प्रकल्पातील सीओडी आणि बिओडीचे निकष बदलल्याने सहा मैलाशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) अद्ययावत केले जाणार आहेत.

त्यासाठी महापालिकेचे सहा एसटीपी पाडून टाकून नवे बांधावे लागणार होते. मात्र, आता चार एसटीपीमध्ये केवळ एरीएशन टँक नवीन बांधावा लागणार असून उर्वरित एसटीपीमध्ये बदल होणार नसल्याने खर्चात सुमारे १०० कोटीची बचत होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

मुळा मुठा नदीमध्ये रोज ९९० एमएलडी मैलापाणी तयार होऊन येत आहे, त्यापैकी ५५० एमएलडी पाण्यावर सध्या प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते. तर उर्वरित ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाचे (जायका) काम सध्या सुरू आहे. हा प्रकल्प २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे.

महापालिकेने २००८ पूर्वी शहरात १० मैला शुद्धीकरण केंद्र उभारले. त्यापैकी नायडू वगळता उर्वरित ९ प्रकल्पांमध्ये मैलापाणी शुद्ध केले जात आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘सीओडी' आणि'बीओडी'चे प्रमाण निकष बदलले. त्याप्रमाणात पाणी शुद्ध करण्याची क्षमता महापालिकेच्या ‘एसटीपी’मध्ये नसल्याने ते कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे ते पाडून नव्याने बांधावे लागणार आहेत. (Latest Marathi News)

त्यासाठी सल्लागार नियुक्त केला होता. सल्लागाराने सहा पैकी चार प्रकल्पांचे डीपीआर महापालिकेला दिले आहेत. त्यातील विठ्ठलवाडी, एरंडवणा, बोपोडी येथील एसटीपीचे तीन डीपीआर एनजीटीकडून तपासणीसाठी पाठवले आहेत.

तर तानाजीवाडी येथील प्रकल्पाचा डीपीआर प्रकल्प विभागाकडून तपासला जात आहे. भैरोबा व नायाडू या दोन प्रकल्पांचा डीपीआर अद्याप प्राप्त झालेला नाही. तर सध्या अस्तित्वात असलेले बाणेर, मुंढवा आणि खराडी ये तीन एसटीपी अद्ययावत असल्याने त्यात बदल करावा लागणार नाही.

सीओडी, बीओडी म्हणजे काय ?

अशुद्ध पाण्यातील रासायनिक पदार्थ्यांचे विघटन करण्यासाठी किती ऑक्सिजनची गरज आहे, यावरून केमिकल ऑक्सिजन डिमांडचे (सीओडी) प्रमाण मोजले जाते. पाण्यातील रासायनिक पदार्थ्यांच्या प्रदूषणाचा मापदंड म्हणून सोओडीचा वापर केला जातो.

तर अशुद्ध पाण्यातील जैविक पदार्थांचे विघटन करण्यासाठी सुक्ष्म जंतूना ऑक्सिजनची किती गरज आहे यावरून (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडचे (बीओडी) प्रमाण मोजले जाते. जेवढे बोओडीचे प्रमाण कमी तेवढे पाणी शुद्ध असते. नव्या निकषांप्रमाणे बीओडीचे प्रमाण १० मिली ग्रॅम आणि सीओडीचे प्रमाण ५० मिली ग्रॅम पर्यंत आणण्यासाठी एसबीआर नावाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्‍यक आहे.

‘केंद्रीय राज्य प्रदूषण महामंडळाने मैलाशुद्धीकरण केंद्राचे निकष बदलले असल्याने महापालिकेला जुने सहा एसटीपी पाडून नवे एसटीपी बांधावे लागणार होते. पण सहा पैकी चार प्रकल्पांमध्ये ‘आय पास’ हे तंत्रज्ञान वापरून केवळ एरिएशन टँक बदलणार आहोत.

त्यामुळे संपूर्ण प्रकल्प पाडून टाकण्याची गरज नाही. त्यामुळे १०० कोटीची बचत होईल. या कामासाठी ४५० कोटी रुपये येणार असून, त्यातील २५ टक्के खर्च महापालिका तर उर्वरित ७५ खर्च केंद्राच्या अमृत योजनेतून केला जाईल. भविष्याची गरज ओळखून ४५२ एमएलडी क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

एसटीपीची सध्याची क्षमता आणि भविष्यातील क्षमता (एमएलडी)

भैरोबा - १३० - २००

एरंडवणे - ५० -५०

तानाजीवाडी - १७ - २७

बोपोडी - १८ - १८

विठ्ठलवाडी - ३२ -३२

नायडू नवीन - ११५ - १२५

एकूण - ३६२- ४५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com