धाकधूक, अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - ‘काय होणार’... अवघ्या काही तासांवर आलेल्या मतमोजणीचा निकाल काय लागेल अन्‌ नशिबात काय असेल, याची धाकधूक बहुसंख्य उमेदवारांना बुधवारी जाणवत होती. निकालाची अनिश्‍चितताही त्यांना अस्वस्थ करीत होती. नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही दिवसभर विविध समीकरणे मांडत आपल्या विजयाचे आराखडे मांडताना दिसत होते. 

पुणे - ‘काय होणार’... अवघ्या काही तासांवर आलेल्या मतमोजणीचा निकाल काय लागेल अन्‌ नशिबात काय असेल, याची धाकधूक बहुसंख्य उमेदवारांना बुधवारी जाणवत होती. निकालाची अनिश्‍चितताही त्यांना अस्वस्थ करीत होती. नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही दिवसभर विविध समीकरणे मांडत आपल्या विजयाचे आराखडे मांडताना दिसत होते. 

महापालिका निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी दहा वाजता शहरात १४ ठिकाणी एकाचवेळी सुरू होणार आहे. महापालिकेतील सत्ता गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीकडे होती. मात्र, लोकसभा- विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली, त्यामुळे महापालिकेतही सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. परिणामी, कधी नव्हे ती काँग्रेस- राष्ट्रवादीची महापालिकेसाठी आघाडी झाली होती. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मोदींची लाट तारणार का आघाडी सत्ता राखणार, याची चर्चा नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांत बुधवारी रंगली होती.

मतदानप्रक्रिया मंगळवारी आटोपल्यावर अनेक उमेदवारांचा बुधवारचा दिवस सकाळी उशिरा सुरू झाला. गेले महिना- दोन महिने सुरू असलेली धावपळ एकदम आटोपल्यामुळे त्यांचे निवडणूक कार्यालयही सामसूम झाले होते. गेले अनेक दिवस दूर असलेल्या राजकारणातील मित्रांचा आज मोबाईलवर संपर्क होत होता. त्या- त्या भागातील चित्र कसे असेल, कोण धोक्‍यात आहे, कोण नक्की येणार, यावर चर्चा सुरू होती.

विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांची प्रभागातील अन्य सहकारी निवडून येणार का, यासाठी चाचपणी सुरू होती. त्यासाठी प्रभागनिहाय मतदानाच्या आकडेवारीवर खल सुरू होता. मतदान एजंटाकडून आलेल्या माहितीचेही विश्‍लेषण सुरू होते. कोणत्या पट्ट्यात मतदान जास्त झाले, कोठे कमी झाले, त्याचा फायदा- तोटा कोणाला होईल, यावर खमंग चर्चा सुरू होती. काही जणांनी देवदेवतांचा धावा केला, तर काहींनी गेले अनेक दिवस न झालेली झोप भरून काढली. 

निवडणुकीसाठी अनेकांनी भलामोठा खर्च केला. त्याबाबतचा कौल आता ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाला. त्यामुळे अनेक उमेदवार, त्यांच्या कुटुंबीयांत अस्वस्थता वाढली होती. खर्चाचा आढावा घेतानाच स्वतःची समजूतही अनेकजण घालत होते, तर काहींनी चक्क वेळ घालविण्यासाठी चित्रपटगृहांची वाट धरली.

निकालावर पैजा! 
अनेक चौकांत, कट्ट्यांवर निवडणुकीच्या निकालावर पैजा लागल्या होत्या. ‘मोदी चालणार, का परत घड्याळच येणार’, यावरही खल सुरू होता. गणेश बिडकर- रवींद्र धंगेकर, दत्ता बहिरट- रेश्‍मा भोसले, सिद्धार्थ शिरोळे- बाळासाहेब बोडके, रूपाली पाटील- गायत्री खडके आदी लढतींवर पैजा सुरू होत्या. तर, महापालिकेत कोणाला किती जागा मिळणार, मुंबईचे काय होणार, पिंपरी- चिंचवडमध्ये काय घडणार, याबद्दलही अनेकांना असलेले औत्सुक्‍य चर्चेतून दिसून येत होते.

Web Title: pune municipal election