राजकीय तोफा आज थंडावणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

पुणे- महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून धडाडलेल्या राजकीय पक्षांच्या तोफा रविवारी (ता. 19) सायंकाळी थंडावतील. मात्र, मतदारांच्या गाठीभेटी, अंतर्गत डावपेच करीत मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागणार आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस आणि साप्ताहिक सुटीचा योग जुळून आल्याने घरोघरी जाऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याकरिता उमेदवारांनी तयारी केली आहे.

जाहीर सभा, कोपरा सभा, "रोड शो'च्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना मत देण्याचे आवाहन करण्याकरिता सर्व राजकीय पक्षांचे बडे नेते पुण्यात असतील. येत्या मंगळवारी (ता. 21) मतदान होणार असून त्याआधी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार थांबणार आहे. गेले आठवडाभर विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभांनी शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून एकमेकांची उणीदुणी काढल्याने प्रचाराची रंगत वाढली. एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपांमुळे शेवटच्या टप्प्यातील प्रचाराने टोक गाठले होते.
प्रचाराचा शेवटचा दिवस आणि रविवारची साप्ताहिक सुटी असल्याने उमेदवार सकाळी सहा वाजल्यापासूनच उद्याने, मैदानांवर फिरायला येणाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन मत देण्याचे आवाहन करणार आहेत. कमीत कमी वेळेत मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पदयात्रा, दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार थांबवावा लागणार असल्याने दिवसभर प्रचाराची धांदल राहणार आहे.

असा होणार प्रचार
- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे सकाळी नऊ वाजता सिंहगड रस्त्यावर "रोड शो'च्या माध्यमातून मते देण्याचे आवाहन करणार आहेत. शहराध्यक्ष ऍड. वंदना चव्हाण याही कोपरा सभा आणि पदयात्रा काढणार आहेत.
- भाजप- रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) उमेदवार आपापल्या प्रभागांमध्ये पदयात्रा, दुचाकी फेरी काढून मतदारांपर्यंत पोचतील.
- कॉंग्रेसनेही वैयक्तिक गाठीभेटी घेण्याचे नियोजन केले आहे.
- शिवसेना व मनसेचे उमेदवारही आपल्या प्रभागांमध्ये जोरदार प्रचार करणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या वतीने सांगण्यात आले.
- भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर हे रविवारी (ता. 19) चार सभा घेणार आहेत. सकाळी दहा वाजता औंध रस्ता, साडेअकरा वाजता पानमळा, साडेबारा वाजता अप्पर- सुपर इंदिरानगर आणि दुपारी दोन वाजता विश्रांतवाडीमध्ये सभा होणार आहे.

Web Title: pune municipal election and rally