चुरशीची लढत अन्‌ शेवटच्या फेरीत बाजी

चुरशीची लढत अन्‌ शेवटच्या फेरीत बाजी

पुणे - कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तीन प्रभागांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत एकूण 11 जागांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार, भारतीय जनता पक्षाला तीन, शिवसेना दोन आणि अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळविला. महापौर प्रशांत जगताप आणि त्यांच्या मातु:श्री रत्नप्रभा जगताप हे विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद आलकुंटे यांनी हॅटट्रिक साधली. कॉंग्रेसचे खंडू लोंढे आणि अपक्ष अशोक कांबळे यांच्यात काट्याच्या लढतीत शेवटच्या फेरीत कांबळे यांनी बाजी मारली. शिवसेनेचे नाना भानगिरे यांना केवळ 67 मतांनी निसटता विजय मिळाला, तर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार फारुख इनामदार हे दोन्ही प्रभागांमधून पराभूत झाले.

वानवडी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात मतमोजणीला सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. निवडणुकीचे निकाल फेरीनुसार ध्वनिवर्धकावरून जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष व्यक्‍त केला जात होता.

रामटेकडी-सय्यदनगर (प्रभाग क्रमांक 24) मधील "अ' गटात अत्यंत चुरशीची लढत झाली. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये कॉंग्रेसचे खंडू लोंढे आघाडीवर होते. सुमारे आठशेहून अधिक मतांनी ते पुढे होते; परंतु अपक्ष उमेदवार अशोक कांबळे यांनी अखेरच्या पाचव्या फेरीत अचानक धडक मारत 1327 मतांनी विजय खेचून आणला.

"ब' गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार रुकसाना शमशुद्दीन इनामदार यांनी भाजपच्या उषा लाकडे यांचा पराभव केला. इनामदार पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. त्यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळविला. "क' गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद आलकुंटे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार फारुख इनामदार यांना 1661 मतांनी पराभूत केले.

वानवडी (प्रभाग क्रमांक 25) "अ' गटातून भाजपचे धनराज घोगरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप जांभूळकर यांच्यात चुरशीची लढत झाली. सहाव्या फेरीअखेर घोगरे यांनी आठ हजार 687 मते घेत विजय मिळविला. जांभूळकर यांना आठ हजार 336 आणि कॉंग्रेसचे साहिल केदारी यांना सात हजार 221 मते मिळाली.

"ब' गटातून भाजपच्या कालिंदा पुंडे यांनी राष्ट्रवादीच्या कांचन जाधव यांना पराभूत केले. पुंडे यांना दहा हजार 111 मते, तर जाधव यांना आठ हजार 154 मते मिळाली. "क' गटातून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप 11 हजार 74 मते मिळवित पुन्हा महापालिकेत दाखल झाल्या. त्यांनी भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कोमल शेंडकर यांना पराभूत केले, तर "ड' गटातून महापौर प्रशांत जगताप यांनी आपली जागा राखली. त्यांनी 13 हजार 685 मते मिळवून भाजपचे दिनेश होले यांना हरविले. होले यांना आठ हजार 607 मते मिळाली.

महंमदवाडी-कौसरबाग (प्रभाग 26) मधील "अ' गटातून शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी आठ हजार 624 मते घेत भाजपच्या अश्‍विनी सूर्यवंशी यांचा पराभव केला. या गटातून राष्ट्रवादीच्या अस्मिता साळवे पहिल्या तीन फेऱ्यांत आघाडीवर होत्या. "ब' गटातून शिवसेनेचे प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, भाजपचे जीवन जाधव आणि राष्ट्रवादीचे फारुख इनामदार यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. त्यात भानगिरे यांना केवळ 67 मतांनी निसटता विजय मिळाला. भानगिरे यांना आठ हजार 323, जाधव यांना आठ हजार 256 आणि इनामदार यांना आठ हजार 149 मते मिळाली. "क' गटातून राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर यांनी पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहत विजय मिळविला. लोणकर यांना आठ हजार 626, तर भाजपच्या स्वाती कुरणे-भानगिरे यांना सात हजार 230 मते मिळाली. विद्यमान नगरसेविका चौथ्या स्थानावर राहिल्या. "ड' गटातून भाजपचे संजय (तात्या) गुलाब घुले हे आठ हजार 809 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे तानाजी लोणकर यांना पराभूत केले.

या प्रभागातून सर्वांत पहिला निकाल
निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रामलिंग चव्हाण, माधव देशपांडे आणि राजेश बनकर यांनी मतमोजणी प्रक्रियेचे उत्तम नियोजन केले. शहरात सर्वांत पहिला निकाल या प्रभागातून जाहीर झाला. दुपारी दोनच्या सुमारास कदम यांनी शेवटच्या प्रभागातील अंतिम निकाल जाहीर केला. कदम म्हणाल्या, कर्मचाऱ्यांनी गुणवत्तापूर्वक काम केले. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया वेळेच्या आत पूर्ण करणे शक्‍य झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com