महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार 

pune municipal election
pune municipal election

ज्येष्ठ शिवसैनिकांचा विश्‍वास; तरुणाईबरोबर एकवटली ज्येष्ठांची ताकद 


पुणे : "शिवसेना इतिहासावर जगत नाही, तर इतिहास निर्माण करते. हत्तीचा आकार नसला तरी आम्हा ज्येष्ठांमध्ये आजही हत्तीचे बळ आहे. तरुणाईबरोबर ज्येष्ठ शिवसैनिकांची ताकद एकवटल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर विजय मिळवून नवा इतिहास निर्माण करेल,'' असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते व माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार यांनी व्यक्त केला. 


शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक नंदू घाटे होते. या वेळी शहरप्रमुख विनायक निम्हण, तानाजी काथवडे, माजी आमदार महादेव बाबर, रमेश बोडके, राजाभाऊ रायकर, जगन्नाथ परदेशी, रामभाऊ पारिख उपस्थित होते.

 
सुतार म्हणाले, ""आमचा जन्म निवडणुकीसाठी नाही, तर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्तीविरुद्ध लढण्यासाठीच झाला आहे. महाराष्ट्राची अवस्था ही पडक्‍या वाड्यासारखी झाली असून, उंदरं बिळे पाडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र वाचविण्यासाठी शिवसैनिकांनी पेटून उठले पाहिजे. शिवसेना हा वटवृक्ष असून, त्याची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत.'' 
""मित्र कसा असावा, अडचणीच्या वेळी तलवारीसारखा पुढे, तर सुखाच्या वेळी ढालीसारखा मागे असावा. आपल्या मित्राने आज विश्‍वासघात करून शिवसेनेलाच संपवण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका निवडणुकीत देशाचे प्रश्‍न सांगण्यापेक्षा भाजपने आधी दैनंदिन प्रश्‍न सोडवावे,'' असे टीकास्त्रही त्यांनी भाजपवर सोडले. या वेळी नंदू घाटे, रमेश बोडके, निर्मला केंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय ठाकर यांनी सूत्रसंचालन केले. 


ज्यांच्या जीवावर राजकारणात आले, तेच आज भाषणात मोठमोठ्याने ओरडून शिवसेनेला पाणी पाजण्याची भाषा करत आहेत. भाजप म्हणजे "भाजका, जळका पक्ष' आहे. 
- जगन्नाथ परदेशी, ज्येष्ठ शिवसैनिक 

ज्येष्ठांची ताकद प्रेरणादायी 
शहरप्रमुख विनायक निम्हण म्हणाले, ""निखाऱ्यावरून चालण्याची तयारी ठेवा,' असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडताना सांगितले. शिवसैनिकांनी तयारी दर्शवत युती तुटल्याचा जल्लोष केला. या तरुण शिवसैनिकांना ज्येष्ठ आणि अनुभवी शिवसैनिकांची ताकद मिळण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकांची एकवटलेली ताकद तरुण शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरेल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com